लासूर स्टेशन : परिसरात टोमॅटो, मका या शेतमालावरील प्रक्रिया उद्योग उभारावे, अशी विनंती उद्योगपती रतन टाटा यांना धामोरीचे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गंगापूर तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो व मका उत्पादन घेतात, परंतु परिसरात उत्पादित मालावर प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात इतरत्र ही उत्पादने विकावी लागतात. यामुळे शेतकरी बांधवांना मेहनतीचे मोल मिळत नाही. यासाठी धामाेरीचे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी उद्योगपती रतन टाटा यांना थेट पत्र पाठवून लासूर स्टेशन परिसरात प्रक्रिया उद्योग उभारण्याची विनंती केली आहे. पत्रात ते नमूद करतात की, परिसरात तुम्ही प्रक्रिया उद्योग उभारावा, येथून समृद्धी महामार्ग गेलेला आहे, तसेच औरंगाबाद-नगर-पुणे महामार्ग, सोलापूर-धुळे महामार्ग, मुंबई-मनमाड-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद रेल्वे मार्गही आहेत. विमानतळही केवळ ३० किमी अंतरावर आहे. अशा प्रकारे उद्योगास चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या उद्योगामुळे शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल, अशी विनंती केली आहे.