छत्रपती संभाजीनगर : येथील औद्योगिक वसाहतीमधून जगभरातील देशांना सुमारे २५ हजार कोटींच्या वस्तूंची निर्यात होते. यात अमेरिकेला होणारी निर्यात सुमारे २७०० कोटींची आहे. अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. १ ऑगस्ट २०२५ पासून या घोषणेची अंमलबजावणी हेाणार असल्याने याचा थेट फटका छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना बसणार आहे. जाणकारांच्या मते येथील उद्योग आणि अमेरिकेतील उद्योग यांना संयुक्तपणे याची झळ सहन करावी लागेल. केंद्र सरकारकडूनही निर्यातदार उद्योगांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज, पैठण, चिकलठाणा, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत, ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसी आदी औद्योगिक वसाहती आहेत. बिडकीन वगळता अन्य सर्वच औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्या जगभरातील देशांना त्यांच्या उत्पादनाचा पुरवठा करीत असतात. यामुळे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी वार्षिक निर्यात सुमारे २५ हजार कोटींची आहे. गत ४ महिन्यांपासून अमेरिकेकडून विविध देशांच्या मालांवर वाढीव टॅरिफ लावण्याची घोषणा केली जात आहे.
काल अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला. यापूर्वी औषधींवर केवळ ५ टक्के टॅरिफ होते. तर अन्य वस्तूंवर १४ ते १५ टक्के कर आकारला जात होता. नव्या टॅरिफची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीमधून अमेरिकेला ऑप्टिकल फायबर (इंटरनेट केबल), औषधी, इलेक्ट्रिक वस्तू, ऑटोमोबाइल स्पेअर पार्ट, सन कंट्रोल फिल्म, अन्नधान्य, फळे, भाजीपाला आदींची निर्यात होते. ही निर्यात सरासरी २७०० कोटींची आहे. टॅरिफ संकटाचा सामना करण्याची तयारी निर्यातदार उद्योगांनी सुरू केली आहे.
संतुलित करार होईल४ महिन्यांपासून अमेरिकेकडून विविध देशांवर वाढीव टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला जात आहे. यामुळे जगभरात अस्थिरता आहे. भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. अशाप्रकारे जगभरातील अनेक कंपन्यांवर त्यांनी टॅरिफ लावला आहे. ज्या कंपन्यांची अमेरिकेतील स्थानिक कंपन्यांसोबत स्पर्धा आहे, त्यांच्यावर अधिक परिणाम होईल. या स्पर्धेत टिकण्यासाठी कंपन्यांना कॉस्ट कटिंग करणे आणि कमी मार्जिनवर व्यवसाय करणे आदी निर्णय घ्यावे लागू शकतात. ब्रिटनसोबत भारताचा जसा करार झाला तसाच संतुलित करार अमेरिकेसोबत होईल, याची उद्योगांना खात्री आहे.- मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योजक.
अमेरिकन लोकच आग्रह करतील अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने तेथील लोकांनाच भारतीय माल २५ टक्के वाढीव दराने खरेदी करावा लागणार आहे. आपण पाठवित असलेला माल गुणवत्तापूर्ण असतो. यामुळे तेथील लोकच भारतावरील टॅरिफ कमी करावे, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आग्रह धरतील.- अर्जुन गायकवाड, अध्यक्ष मसिआ.