हतनूर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवना नदीवरील पुलाचे काम निकृष्ट झाल्याचे समोर आले आहे. पुलाचे बांधकाम होऊन सहा महिनेदेखील झाले नाही, तोच त्याला अवकळा सुरू झाल्या आहेत. चारही बाजूने जागोजागी पूल खचला जात असल्याने या कामाची चौकशी करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी टापरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
महामार्गावरील खान्देश व मराठवाड्याला जोडणारा शिवना पूल हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सहा ते सात महिन्यांपूर्वी टापरगाव येथील शिवना नदीच्या पुलाचे कामदेखील करण्यात आले. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून दबाई करून डांबरीकरण करण्यात आले व पूल रहदारीस सुरू करण्यात आला; पण पुलाच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्या पावसातच चारही बाजू ढासळू लागल्या आहेत. पुलावरील लोखंडदेखील उघडे पडले. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. लवकरात लवकर पुलाचे काम न झाल्यास मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, असे ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे तहसील कार्यालयाला कळविले.
----
पथदिवे बनले शोभेची वस्तू
टापरगाव गावालगत लावण्यात आलेले पथदिवे फक्त शोभेची वस्तू बनले आहेत. पथदिवे कायम बंद राहत असल्याने रात्री अपरात्री वाहनधारकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे, तर अपघाताच्या घटनांतदेखील वाढ होत आहे.
---
अपघाताची घटना होऊ शकते
शिवना नदीवरील पुलाचे काम हे सात महिन्यापूर्वीच पूर्ण झाले. परंतु सहा-सात महिन्यातच पूल खचू लागला आहे. लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. अपघाताच्या घटना होऊ शकतात.
- रूपाली मोहिते, सरपंच, टापरगाव.
120721\img_20210709_172002.jpg
शिवना नदीवरील पुलाच्या ढासळत असलेल्या बाजू