परभणी : पाथरी तालुक्यातील आनंदनगर येथील काही आरोपींनी डॉ. सुभास पवार यांना मारहाण करुन त्यांच्याजवळील सोन्याच्या साखळीसह ऐवज लंपास केला. या आरोपींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी आनंदनगर ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.पाथरी तालुक्यातील आनंदनगर येथे राहणारे डॉ. सुभाष पवार यांना सोनपेठ येथे ड्युटीवर जात असताना भीमराव राठोड, सुरुबाई राठोड, विकास राठोड, अनिल राठोड या आरोपींनी मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व खिशातील दहा हजार रुपये बळजबरीने काढून घेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच तुझ्या विरुद्ध विनयभंग व बलात्कारची केस करु, अशी धमकी देऊन शिवीगाळ करण्यात आली. हे आरोपी पाथरी तालुक्यातील आनंदनगर येथील रहिवासी असून ते ग्रामस्थांना विनाकारण नाहक त्रास देतात. याबद्दल आवाज उठविल्यास गावकऱ्यांविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करु, अशी धमकी देतात. त्यामुळे अनेक ग्रामस्थ गाव सोडण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आनंद नगर येथील राजेभाऊ पवार, नामदेव पवार, मोतीराम पवार, विजय पवार, भारत पवार, विलास पवार, अनिल राठोड यांच्यासह ४० ते ४५ ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करा
By admin | Updated: October 15, 2016 01:17 IST