औरंगाबाद : मतदार यादीतील नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यभरात एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने आता नाव वगळण्याबाबत सावध धोरण स्वीकारले आहे. मतदार यादीतून नावे वगळण्याआधी आयोगाची परवानगी घ्या, अशी सूचना आयोगाने जिल्हा प्रशासनाला केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या आधी आयोगातर्फे राज्यात मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यात मृत आणि स्थलांतरित या नावाखाली लाखो नावे यादीतून वगळली गेली. त्यामुळे अनेकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही. मुंबई, पुणे, अमरावतीसह राज्यातील इतर भागातही असा प्रकार मोठ्या प्रमाणावर झाला. औरंगाबाद जिल्ह्यातही सव्वालाख नावे यादीतून वगळण्यात आली होती. आता विधानसभा निवडणुकीआधी मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात ९ जूनपासून नावनोंदणी, दुरुस्ती, वगळणीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने वगळणीबाबत परस्पर निर्णय घेऊ नये, नावे वगळायची असतील तर त्यासाठी आयोगाची परवानगी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आयोगाने दिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.तालुक्यात १८ हजार अर्जजिल्ह्यात ९ जून ते ३० जून या काळात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत औरंगाबाद तालुक्यात २९ जूनपर्यंत एकूण १८ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. औरंगाबाद तालुक्यात औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या तीन मतदारसंघांप्रमाणेच पैठण आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा काही भागही येतो. तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात सर्वाधिक ८ हजार ६५६ अर्ज मध्य मतदारसंघातून आले आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम मतदारसंघातून ३ हजार ९०५ आणि पूर्व मतदारसंघातून ३ हजार ८९३ अर्ज आले आहेत.
नावे वगळण्याअगोदर आयोगाची परवानगी घ्या
By admin | Updated: July 1, 2014 01:09 IST