उस्मानाबाद : शहरातील बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गासह शिवाजी चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला झालेले अतिक्रमण नगर पालिका, बांधकाम विभाग व महसूल प्रशासनाच्या वतीने मंगळवारी संयुक्त कारवाई करून हटविण्यात आले़ अतिक्रमण हटविताना अनेक व्यवसायिकांशी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची शाब्दिक चकमक उडाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ अतिक्रमण हटाव मोहिमेत जेसीबी चालविण्यात आल्याने व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले.शहरातील तेरणा महाविद्यालय ते आयुर्वेदिक महाविद्यालयादरम्यान व बांधकाम विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर शब्दात तहसील, नगर पालिका व बांधकाम विभागाला सूचना दिल्या होत्या़ या अनुषंगाने प्रारंभी जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीजवळून ते बांधकाम विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यास मंगळवारी सकाळपासूनच सुरूवात करण्यात आली़ यावेळी अब्दुल अलिम अब्दुल गणी कुरेशी यांनी ही जागा आपली असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना कागदपत्रे दाखविण्याचा प्रयत्न केला़ या जागेचे प्रकरण न्यायालयात सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले़ यावेळी कुरेशी व अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली़ तहसीलदार सुभाष काकडे, नायब तहसीलदार राजेश जाधव, नगर पालिकेचे मुख्याधिकारी शशिमोहन नंदा, बांधकाम विभागाचे अभियंता एस़एस़पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते़ येथून पंचायत समिती, नगर पालिकेजवळ झालेले अतिक्रमण हटविण्यात आले़ ही कारवाई दुपारपर्यंत सुरू होती़ शहरातील शिवाजी चौकापर्यंतची जवळपास ६० अतिक्रमणे प्रशासनाने संयुक्त कारवाईतून हटविली़ प्रशासनाने चक्क जेसीबी आणल्याने अनेक व्यवसायिकांनी आपापले साहित्य नेण्यासाठी एकच धावपळ सुरू केली होती़ मिळेल त्या वाहनात साहित्य नेण्यासह फरशी काढण्याचे काम सुरू होते़ अशीच कारवाई शहरातील अन्य मार्गावर राबविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
शहरातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा
By admin | Updated: January 21, 2015 01:07 IST