सहकार व पणन मंत्री : विना परवाना सावकारी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
औरंगाबाद : विभागातील सर्व जिल्ह्यांनी कर्ज वसुलीचा आढावा घेऊन सर्व थकबाकीदारांची तालुकानिहाय यादी करावी. वसुली मोहीम प्रभावी राबवावी. थकबाकीदार संस्था, कारखान्यांची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करावी. विनापरवाना सावकारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार व पणन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद व लातूर विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर निबंधक डॉ.पी.एल. खंडागळे, विशेष कार्य अधिकारी अविनाश देशपांडे, संतोष पाटील यांच्यासह विभागातील सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधकांची उपस्थिती होती.
सहकार मंत्री पाटील म्हणाले, ‘‘महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हा, तालुका स्तरावर प्राप्त तक्रारींचे नियोजनपूर्वक तातडीने निवारण करावे. त्याच प्रमाणे अवसायनातील नागरी सहकारी बँका, संस्था यांना मुदतवाढ दिलेल्या काळात काम पूर्ण झाले पाहिजे. वसुलीसाठी संबंधिताने कृती आराखडा तयार करून वसुलीवर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी सहनिबंधक, उपनिबंधकांनी प्राप्त अधिकारांचा योग्य वापर करून वसुलीसाठीची कारवाई प्रक्रिया राबवावी. वेळेत लेखा परीक्षण करून संस्था बंद पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वाढवा
शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे मूळ उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँकांच्या पूर्ततेबाबत जुलै अखेर जिल्हाधिकारी स्तरावर उपनिबंधकांनी आढावा घेऊन उद्दिष्टात वाढ करण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिले.