औरंगाबाद : विदर्भात स्वाइन फ्लूबाधित ४ रुग्ण आढळून आले. एकाचा मागील आठवड्यातच मृत्यू झाला. विदर्भानंतर आता मराठवाड्यातही स्वाईन फ्लू दाखल झाला आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील ५५ वर्षीय संभाजी मुंढे या माजी सैनिकाचे स्वाईन फ्लूने शुक्रवारी औरंगाबादेत खाजगी रुग्णालयात निधन झाले. या वर्षातील स्वाईनफ्लूचा हा पहिला बळी ठरला आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यावर स्वाईन फ्लूचे संकट ओढवले आहे. औरंगाबादेतील गारखेडा परिसरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये २५ जुलै रोजी त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसावर सूज आली होती. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. मुंढे यांच्या रक्तामध्ये स्वाईन फ्लूचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील रहिवासी संभाजी मुंढे हे माजी सैनिक वारीला जात असत. नुकतेच ते आषाढीनिमित्त पंढरपूरच्या वारीला गेले होते. त्यांच्या मुलाने सांगितले की, वारीहून घरी आल्यानंतर त्यांनी अंगदुखी होत असल्याचे सांगितले. त्यांना ताप आला. स्थानिक डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी औरंगाबादेत पाठविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार गारखेडा परिसरातील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. दुपारी पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावाकडे नेण्यात आले. डॉ. दिलीप ठोंबरे यांनी सांगितले की, संभाजी मुंढे यांच्या फुफ्फुसावर सूज आली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने आम्ही मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविले. स्वाइन फ्लूची लक्षणे असल्याचा संशय आल्याने आम्ही आधीच उपचार सुरु केले होते. गुरुवारी अहवाल आला. त्यात स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. याची माहिती आम्ही मनपा आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक यांना कळविली आहे.
मराठवाड्यात पुन्हा स्वाईन फ्लू दाखल
By admin | Updated: July 30, 2016 01:01 IST