जालना : देशात स्वच्छता राहावी यासाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील तांडूर येथील युवक दुचाकीवरुन भारतभ्रमणावर निघाला आहे. शनिवारी हा युवक जालन्यात आला असता त्यांने ‘लोकमत’ सोबत संवाद साधला. स्वच्छ भारत अभियानासोबतच स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये याचाही प्रचार या यात्रेतून केला जात आहे. तांडूर येथील प्रवीणकुमार जल्लू (३०) यांनी ३१ मे पासून भ्रमण सुरु केले आहे. ७ जून रोजी ते कन्याकुमारी येथे पोहचले. त्यानंतर काश्मिर, आसाम, गोवा मार्गे त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. प्रवीणकुमार म्हणाले, आपला देश विविधतेने नटला आहे. मोठी परंपरा आहे. मात्र ठिक ठिकाणी अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती व्हावी म्हणून ही यात्रा सुरु केली. दिवसाकाठी ३०० किलोमीटर आंतर कापतो. वैयक्तिक संदेश देण्यासोबतच शाळा, महाविद्यालये, निवासी तसेच व्यापारी संकुलांमध्ये जाऊन स्वच्छतेबाबत प्रबोधन करत आहे. स्वच्छतेसोबतच स्त्रीभू्रण हत्या रोखण्यासाठी तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये म्हणून जनजागृती करीत आहे. २ आॅक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीदिनी तांडूर येथे या यात्रेचा समारोप करणार असल्याचे प्रवीणकुमार यांनी सांगितले. अधिक माहिती देताना प्रवीणकुमार म्हणाले, कोणतेही लक्ष अथवा उद्देश डोळ्यासमोर नव्हता. पण काहीतरी वेगळे करुन दाखवावे या प्रेरणेनेच ही यात्रा सुुरुवात झाली. आज रोजी पंधरा ते वीस हजार किमी अंतर कापले आहे. अनेक अनुभव आले. मात्र त्रास कोठेही झाला नाही. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करुन देशासाठी काहीतरी वेगळे केले जात आहे. त्यातूनही स्वच्छतेसारखा महत्वाचा संदेश या यात्रेतून दिला जात आहे. याचे लोकांना कौतुक आहे.
स्वच्छ भारत अभियानासाठी भारतभ्रमण
By admin | Updated: June 21, 2015 00:17 IST