आष्टी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये तहसील, बांधकाम प्रशासनाने बुधवारी परतूरचे तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या उपस्थितीत राज्य महामार्ग लगत येणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या धार्मिक स्थळाचे मोजमाप करून पाहणी करण्यात आली.गावातील नागरिकांची आष्टी पोलीस ठाण्यात बैठक घेऊन हरकती जाणून घेतल्या. यावेळी तहसिलदार विनोद गुंडमवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, बी.डी.म्हस्के, ग्रामविकास अधिकारी डी.बी.काळे, स.पो.नि.पंकज जाधव, मंडळ अधिकारी भगवान घुगे, सरपंच बाबाराव थोरात आदींची उपस्थिती होती. यावेळी तहसिलदार गुंडमवार यांनी सांगितले की, आष्टी मोंढा फाटा ते गाव दरम्यान येत असलेल्या मशीद व दर्गा तसेच कब्रस्तानच्या भिंत या सर्वांचे रस्त्याच्या मधुन दोन्ही बाजूने ५० फुट या प्रमाणे मोजमाप करण्यात आले असून याचा अहवाल शासनाकडे देण्यात येणार आहे. दरम्यान या बाबत गावकऱ्यांनी हरकती घेत रस्त्यालगत मंदीर, मशीद तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असल्याने शासनाने गावाच्या बाहेरून बायपास काढावा किंवा या ठिकाणी कमी रूंदी घ्यावी असा ठराव संमत केला. यावेळी बोलतांना तहसिलदार म्हणाले की, सर्वांच्या सहमतीने आपण शासनाकडे अहवाल पाठवणार असून नागरिकांच्या हरकती ग्राह्य धरल्या जातील असे ते म्हणाले. यावेळी एजाज जमिनदार, बाबर पठाण, शेख अहेमद, साबेर मणियार, अजीम कुरेशी, फारूक कुरेशी, मुर्तुजा कल्याणकर, शेख निसार आदींसह गावातील शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
न्यायालयाच्या आदेशाने आष्टीत धार्मिकस्थळांची पाहणी
By admin | Updated: September 10, 2015 00:29 IST