लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसारच जि. प. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी भर उन्हात आज सोमवारी दुपारी बदली हवी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात वर्षानुवर्षे अवघड क्षेत्रात काम करणारे जिल्हाभरातील शिक्षक- शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांचे सर्वसाधारण व अवघड असे दोन गट तयार करण्यात आले असून, सर्वसाधारण क्षेत्रात सलग १० वर्षे सेवा करणारे शिक्षक बदलीपात्र समजण्यात आले आहेत. अपंग, विधवा, परित्यक्ता, गंभीर आजारी शिक्षकांना बदलीसाठी प्राधान्य देण्यात आले असून, दूर अंतरावर कार्यरत पती- पत्नी यांना एकत्र करण्याची सुविधा, तसेच वर्षानुवर्षे अवघड (दुर्गम) क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत बदलीने येण्याची संधी दिली जाणार आहे.या शासन निर्णयानुसार गेल्या वर्षी आॅनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु काही शिक्षकांनी या शासन निर्णयास न्यायालयात आव्हान दिले होते. तेव्हा प्रत्येक न्यायालयात हा शासन निर्णय बदलीसाठी योग्य आहे, यावर शिक्कामोर्तब करून सर्व याचिका निकाली काढल्या होत्या.न्यायालयीन प्रक्रियेत सहा महिन्यांचा वेळ गेल्यामुळे शासनाने नोव्हेंबर महिन्यात बदली प्रक्रिया स्थगित केली होती. यंदा ५ एप्रिलपासून पुन्हा आॅनलाईन बदली प्रक्रिया सुरू झाली. यंदाही काही शिक्षकांनी पुन्हा बदली प्रक्रियेविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांच्या दबावात येऊन शासनाने बदली प्रक्रिया पुन्हा याहीवर्षी स्थगित करू नये, याकरिता बदली हवी असलेल्या हजारो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने हा मोर्चा काढून शासनाच्या निर्णयाचे समर्थन केले. जिल्हा परिषदेच्या मैदानावरून सोमवारी दुपारी २ वाजता हा मोर्चा निघाला. तो सिटीचौक, काळा दरवाजामार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चातील अपंग शिक्षक व महिलांच्या शिष्टमंडळाने विभागीय उपायुक्त विद्या ठाकूर यांना निवेदन सादर केले. मोर्चात सहभागी दिव्यांग शिक्षकांनी मोर्चात सहभागी होऊन बदलीची तीव्रता शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला. मोर्चात छापील कागदाची बनवलेली टोपी लक्षवेधी ठरली. मोर्चात महिला शिक्षिका, दुर्गम भागातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. मोर्चाचे समन्वयक महेश लबडे, नवनाथ जाधव, पांडुरंग गोर्डे यांनी आभार मानले. प्राथमिक शिक्षक समितीने विभागीय आयुक्तालयाजवळ मोर्चेकरी शिक्षकांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती.
बदलीच्या समर्थनार्थ शिक्षक भर उन्हात रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:25 IST