उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. सकाळी साडेनऊ ते दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होते. दुपारी बारानंतर तर घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख मार्गांवर शुकशुकाट पहावयास मिळत आहे. सोमवारी उन्हाचा पारा ४०.०४ अंश सेल्सिअसवर जावून ठेपला होता. मंगळवारी तापमानात काहीअंशी घट झाली. या दिवशीचे तापमान ४० अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले.उस्मानाबाद शहरासह परिसरात उन्हाचा चटका कायम आहे. तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. साधारणपणे सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटका जाणवत असून अकरानंतर तर घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. नेहमी वर्दळ असणाऱ्या शहरातील प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठेतही दुपारी बारानंतर शुकशुकाट पहावयास मिळतो. उन्हाची ही तीव्रता दुपारी चारनंतर कमी होते. त्यामुळे नागरिक सायंकाळच्या सुमारासच घराबाहेर पडणे पसंत करीत आहेत. या वाढत्या तापमानामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित होत आहे. १ एप्रिल रोजी शहराचे कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले होते. तर किमान तापमान २८.५ अंश सेल्सिअस इतके होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ एप्रिल रोजी कमाल तापमानामध्ये पुन्हा वाढ झाली. सुमारे ४०.९ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. किमान तापमानात मात्र घसरण झाली. २४.०१ अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली होती. ३ एप्रिल रोजी तापमान काहीप्रमाणात कमी झाले. परंतु, पारा ४० अंशावर राहिला. ४०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर किमान तापमानात वाढ होवून ते २४.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. मंगळवारीही तापमानामध्ये फारशी घट झाली नाही. पारा ४० अंश सेल्सिअसवर जावून ठेपला. मागील काही दिवसांतील आकडेवारीवर नजर टाकली असता, पारा चाळीस अंशाच्या पुढेच आहे. दिवसभर कडक्याचे उन्ह आणि मध्यरात्रीनंतर वातावरणात हलकासा गारवा निर्माण होत असल्याने ताप, सर्दी, खोकला आदी आजार बळावताना दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)
सूर्य आग ओकतोय !
By admin | Updated: April 4, 2017 23:21 IST