औरंगाबाद : ईशान्य दिल्लीतून घर सोडून पळालेला १४ वर्षीय मुलगा आज सकाळी रोशनगेट परिसरातील मकसूद कॉलनी येथे सुखरूप सापडला. त्याला दिल्ली पोलीस आणि नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कामगिरी सायबर क्राईम सेलने केलेल्या विशेष परिश्रमानंतर यशस्वी झाली.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, उत्तर पूर्व दिल्लीतील खजुरीखास पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भागातून ९ जुलै रोजी हा १४ वर्षीय मुलगा घरातून पळून गेला होता. औरंगाबादेतील एक ट्रकचालक त्याला भेटला. त्यावेळी त्याने घरातून पळून आल्याचे तसेच मला घरी जायचे नाही, असे सांगितले. त्यामुळे त्याने त्याला सोबतच ठेवले. तो ट्रकवर क्लिनर म्हणून काम करू लागला. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा तो औरंगाबादेत राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे दिल्ली पोलिसांचे एक पथक ५ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत आले. या पथकासोबत अपहरण झालेल्या मुलाचे वडील आणि चुलतेही होते. सायबर क्राईम सेलचे निरीक्षक गौतम पातारे यांची भेट घेऊन त्यांनी मुलाच्या शोधासाठी मदत करण्याची विनंती केली. त्याआधारे सहायक आयुक्त बाबाराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पातारे, सहायक निरीक्षक राहुल खटावकर, उपनिरीक्षक अरुण घोेलप, पोलीस कर्मचारी रफिक सय्यद, धुडकू खरे, नितीन देशमुख, रवी खरात आदींनी सलग दोन दिवस शहराच्या वेगवेगळ्या भागांत त्या मुलाचा शोध घेतला. तेव्हा ट्रकचालकासोबत तो मुंबईला गेला होता. तो काल रात्री २ वाजता चंपा चौक, मकसूद कॉलनी येथे ट्रक घेऊन मुंबईहून परतला. नातेवाईकांना आपला मुलगा दिसताच त्यांनी त्यास ओळखले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्यास दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दिल्लीतून पळून आलेला मुलगा औरंगाबादेत सुखरूप
By admin | Updated: September 8, 2014 00:33 IST