लातूर : समाजकल्याण विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ३४९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. या प्रकरणाची विभागीय पथकामार्फत चौकशी करण्यात आली असून, त्याचा अहवाल उपायुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्तांनी जिल्हा सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, ज्यांच्यावर हलगर्जीपणा केल्याच्या ठपका आहे, त्यांनी राज्याच्या आयुक्तांकडे आपली बाजू मांडल्याचे समजते.विस्तारीत एमआयडीसी भागात असलेल्या समाजकल्याण विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ३४९ विद्यार्थ्यांना ३ डिसेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. या प्रकरणी भोजन पुरवठा करणाऱ्या तेजल ट्रेडर्सचा ठेका तडकाफडकी रद्द करून संतोष ट्रेडर्सला देण्यात आला होता. मात्र वसतिगृहातील शासकीय कर्मचाऱ्यांनी भोजनाची चव घेतली होती का नाही, दररोज नोंदवहीत त्याची नोंद केली जाते का, विषबाधा झाली त्यादिवशी कोणाची सेवा होती. भोजन ठेका असणाऱ्या संस्थेच्या कामकाजाची दैनंदिन तपासणी केली जाते की नाही, याची तपासणी करण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या उपायुक्तांनी विभागीय चौकशी पथक नेमले होते. या पथकाने चौकशीचा अहवाल बुधवारी उपायुक्तांकडे सादर केला आहे. उपायुक्त लक्ष्मण वाघमारे यांनी या अहवालाच्या अनुषंगाने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा सहाय्यक आयुक्त बी. जी. अरावत यांना दिले आहेत. शिवाय, या चौकशीचा अहवाल राज्याच्या आयुक्तांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती विभागीय उपायुक्त वाघमारे यांनी दिली.दरम्यान, चौकशी अहवालात एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील युनिट १, २, ३ आणि ४ क्रमांकाच्या अधीक्षकांवर ठपका ठेवण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळे चारही वसतिगृह अधीक्षकांनी पुणे येथे ११ जानेवरी रोजी आयुक्तांकडे आपली बाजी मांडली आहे. भोजन पुरवठ्याच्या अनियमितेबाबत संबंधित ठेकेदारास दंड केल्याचे आयुक्तांना सांगितले आहे. त्यामुळे कारवाई काय होणार आणि कोणावर होणार याकडे लक्ष लागले आहे.
विभागीय पथकाचा अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 00:27 IST