औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सायन्स कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीमुळे ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी तीन ते चार विद्यार्थ्यांना रात्री मारहाण झाल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी मंगळवारी सायन्स कॅन्टीनवर बहिष्कार टाकला. सोमवारी एका विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची काही जण मोबाईलवरून व्हिडिओ शूटिंग घेत होते. ७.१५ वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. आंदोलक विद्यार्थी होस्टेलकडे परतत असताना तीन ते चार विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची माहिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांत दहशत पसरली असून, आंदोलन करणारे अनेक विद्यार्थी मंगळवारी सकाळीच गावाकडे गेल्याची माहिती मिळाली. मंगळवारी नेहमीप्रमाणे सायन्स कॅन्टीन सुरू झाली. मात्र, तिथे तुरळक विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांनी या कॅन्टीनवर बहिष्कार घातल्याचे चित्र दिसले. दरम्यान, कॅन्टीनचालकाने निविदेत कोणते दर दिले आणि प्रत्यक्ष़ात किती दर आकारण्यात येतात याविषयी माहिती घेण्यासाठी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे आणि प्रभारी कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाठ यांना दूरध्वनी केला असता संपर्क होऊ शकला नाही.
विद्यापीठ कॅन्टीनवर विद्यार्थ्यांचा बहिष्कार
By admin | Updated: December 22, 2015 23:57 IST