तीर्थपुरी : सहलीला जाण्यासाठी पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात विद्यार्थिनीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुरमा येथे रविवारी सकाळी ८ वाजता घडली.मुरमा येथील शामसुंदर मुकणे यांची मुलगी शीतल मुकणे व मुलगा कमलेश मुकणे हे मत्स्योदरी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. शाळेची सहल बाहेरगावी जाणार असल्याने शामसुंदर मुकणे यांनी मुलाचे पैसे शाळेत जमा केले. परंतु मुलीचे पैसे नंतर भरणार होते. बँकेत वेळेवर पैसे मिळत नाही त्यामुळे सोमवारी पैसे कोणाकडून तरी घेऊन भरू, असे ठरले. परंतु मुलाचे पैसे भरले व माझे भरणार नाही, असे समजून शीतल मुकणे हिच्या मनात राग आला. शनिवारी रागात तिने रात्री जेवणही घेतले नाही. आई-वडील बाहेर जाताच रविवारी पहाटे तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यार्थिनीच्या या मृत्युबद्दल शाळेत तसेच गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
मुरमा येथे विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Updated: January 8, 2017 23:53 IST