उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंंडळाचे चालक, वाहकांसोबतच अन्य कर्मचाऱ्यांनी गुरूवारी पुकारलेल्या संपामुळे विशेषत: ग्रामीण भागातील बससेवा पूर्णत: ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांवर बसस्थानकामध्ये ताटकळत बसण्याची वेळ आली. जवळपास अडीच ते तीन तास चाललेल्या या संपामुळे एसटीच्या तब्बल दीडशेवर फेऱ्या कमी झाल्या. तर सव्वादोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले.एसटीचे खाजगीकरण करण्यात येवू नये, रोड ट्रान्सपोर्ट व सेफ्टी बिलामध्ये बदल करण्यात यावा यासह आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरूवारी संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे गुरूवारी सकाळपासूनच एसटी बसेस स्थानकामध्येच उभ्या होत्या. याचा फटका विशेषत: ग्रामीण प्रवाशांना बसला. परिवहन मंत्र्यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर जवळपास अडीच तासाने हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर म्हणजेच साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास बससेवेला सुरूवा झाली. या अडीच ते तीन तासांमध्ये एसटीच्या तब्बल १६७ फेऱ्या कमी झाल्या. परिणामी २ लाख ३६ हजारांचे आर्थिक नुकसान झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. प्रवाशी ताटकळलेअनेक प्रवाशांना संपाबाबत कल्पना नव्हती. त्यामुळे असे प्रवाशी बसेच्या वेळेनुसार स्थानकामध्ये दाखल झाले होते. परंतु, येथे आल्यानंतर संप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे काही प्रवाशांनी खाजगी वाहनांचा आधार घेत गाव गाठले. तर काहींनी घरी परतने पसंत केले. एकूणच प्रवाशांना तब्बल अडीच ते तीन तास ताटकळत बसावे लागले. (प्रतिनिधी)
एसटीला सव्वादोन लाखांचा फटका !
By admin | Updated: May 1, 2015 00:50 IST