खिळद गावची परिस्थिती : दोन टँकरवर तीन हजार नागरिकांची भागतेय तहाननितीन कांबळे ल्ल कडामागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामस्थांची आजही हंडाभर पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात केवळ दोनच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.खिळद गावची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात आहे. परंतु परिसरातील जलस्त्रोत आटल्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. भटकंती करूनही पाणी मिळत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. प्रशासनाकडे हात पसरल्यानंतर केवळ दोन टँकर देऊन बोळवण करण्यात आली. परंतु गावची लोकसंख्या पाहता टँकरची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.अनेक वेळा वेळेवर टँकर येत नसल्याने लहान मुलांना सोबत घेऊन महिला उजाडल्यापासूनच घराबाहेर पडत आहेत. ही परिस्थिती केवळ खिळद ग्रामस्थांची नसून, परिसरातील १० ते १५ खेड्यांमधील चित्र यापेक्षा वेगळे नाही.एप्रिल महिन्यातच खिळद गावात भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने येणारे दोन महिने काढायचे कसे असा प्रश्न आता ग्रामस्थांसमोर उभा आहे. पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी स्थलांतरही केले आहे. काहीजण शेतात राहण्यासाठी गेले आहेत. जनावरांचेही पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याने शेतकऱ्यांनी जनावरे विकून टाकली आहेत.टँकरची संख्या वाढवासध्या सुरू असलेली टँकरची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. टँकरची संख्या वाढवून ग्रामस्थांचे हाल कमी करावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.लहान मुलांच्याही डोक्यावर दिसतो पाण्याचा हंडाआष्टी तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांची वणवण भटकंती सुरू आहे. सकाळी उजाडतच लहान मुलांपासून ते महिला, पुरूषांच्या डोक्यावर पाण्याचा हंडा पाहवयास मिळतो. ही परिस्थिती संपूर्ण तालुक्यात दिसून येते.जनावरांचेही पिण्याच्या पाण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे बाजारात विक्रीसाठी दाखल केली आहेत. तसेच परिसरातील जलस्त्रोतही आटल्यामुळे पाणी आणायचे कोठून ? असा प्रश्न खिळद ग्रामस्थांसमोर उपस्थित राहिला आहे.
हंडाभर पाण्यासाठी संघर्ष !
By admin | Updated: April 16, 2016 23:26 IST