भारत दाढेल । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी प्रभाग रचना व आरक्षणाची सोडत काढण्यात आली़ या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना असल्याने अनेकांचे लक्ष या सोडतीकडे लागले होते़ विद्यमान नगरसेवकांसह काही माजी नगरसेवकांचे गड या आरक्षणात कायम राहिले असले तर काही प्रभागात मात्र एकाच पक्षाचे इच्छुक उमेदवार आमने- सामने आल्याने अडचण निर्माण झाली आहे़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कामकाजाला सकाळी सव्वा अकरा वाजता सुरूवात झाली़ मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रारंभी प्रभाग रचना व त्या ठिकाणच्या आरक्षणाची प्रक्रिया समजून सांगितली़ त्यानंतर आरक्षण सोडतीला सुरूवात झाली़ आपल्या प्रभागातील आरक्षण जाहीर होताच, संबंधित नगरसेवक व इच्छुकांनी समाधान व्यक्त केले़ तर कार्यकर्त्यांनीही आपला उमेदवार सुरक्षीत राहिल्याने जल्लोष केला़ बहुसदस्यीय प्रभाग रचनेत १९ प्रभागात प्रत्येकी चार तर एका प्रभागात पाच नगरसेवकांना निवडून द्यायचे आहे़ त्यामुळे त्या प्रभागाची व्याप्ती व रचना कशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ आपला प्रभाग आवाक्यात येतो की नाही, यासाठी अनेकांचे जीव टांगणीला लागले होते़ परंतु प्रभाग रचना पाहून इच्छुकांचे चेहरे उजळले होते़ येत्या आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आरक्षण सोडतीने प्रारंभ झाला़ सोयीचे आरक्षण निघाल्यामुळे काही नगरसेवकांनी मतांची बेरीज जुळविण्यास सुरूवात केली़ काही विद्यमान नगरसेवकांना मात्र या आरक्षणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे़ तर काही ठिकाणी एकाच पक्षाचे दिग्गज इच्छुक आमने- सामने येणार आहेत़ त्यामुळे त्या पक्षासमोर पेच निर्माण होणार आहे़ आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुकांनी दंड थोपटले़ होळी प्रभागात शिवसेनेचे महेश खोमणे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला़
प्रभाग रचनेत नगरसेवकांचे गड कायम
By admin | Updated: July 7, 2017 00:21 IST