वाशी / ईट : येडशी येथील तीन घरफोड्यांना २४ तास लोटण्यापूर्वीच चोरट्यांनी उस्मानाबाद शहरासह वाशी तालुक्यातील सरमकुंडी, भूम तालुक्यातील ईट परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास एकच धुमाकूळ घातला़ चोरट्यांनी कार, दुचाकीसह साधारणत: सात ते आठ लाखाचा मुद्देमाल एकाच रात्रीत लंपास केला़ या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांसमोर चोरट्यांना रोखण्याचे आव्हान उभा राहिले आहे़ उस्मानाबाद शहरातील भानुनगर भागात राहणारे नितीन तावडे यांनी त्यांची कार (क्ऱएम़एच़२५- आऱ५१७५ ) ही शुक्रवारी रात्री घरासमोर लावली होती़ ही कार मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केली़ या प्रकरणी तावडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ या घटनेने शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे़ वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील सरपंच दिनकर शिंदे, अॅड.रमेश गायकवाड व तुकाराम गायकवाड यांचे घर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केले़ शिंदे कुटुंबिय शनिवारी रात्री झोपेत असताना पाच ते सात चोरट्यांनी आजूबाजूच्या घराला बाहेरून कड्या लावून शिंदे यांच्या घरात प्रवेश केला़ यावेळी शिंदे यांच्या घरातून ३५ हजार रूपये रोख व तिन ते चार तोळे सोने, अॅड.रमेश सखाराम गायकवाड यांच्या घरातून १० हजार रूपये रोख आर्धा किलो चांदीचे दागिने व सोन्याचे दागिने तर तुकाराम विष्णू गायकवाड यांच्या घरातून ३५ हजार रूपये रोख असा साधारणत: अडीच लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ याबाबत वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ तर पोनि साईनाथ ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले़ भूम तालुक्यातील ईट येथील नागेवाडी चौकातील बसथांब्याजवळ अनिल नारायण देशमाने यांचे किराणा दुकान आहे़ हे किराणा दुकान शुक्रवारी रात्री फोडून चोरट्यांनी २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ तर रामचंद्र गायकवाड यांच्या घरासमोरून त्यांची दुचाकी (क्ऱएम़एच़१४- क्यू ६४६२) चोरट्यांनी लंपास केली़ तसेच पोलीस औटपोष्टपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अप्पासाहेब दगडू चव्हाण यांच्या पानटपरीचे शटर उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ आतील चॉकलेट, बिस्कीट, तंबाखू, सिगारेट पॉकेट असा साधारणत: सहा हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ दरम्यान, येडशीपाठोपाठ सरमकुंडी व ईट परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने खळबळ उडाली आहे़
चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
By admin | Updated: November 8, 2015 23:38 IST