बदनापूर - येथील प्रभाग क्र ४ मध्ये पाणीपुरवठा करण्याच्या मागणीकरिता या प्रभागातील महिला व पुरूषांनी येथील महामार्गावर शनिवारी रस्तारोको करून आपला रोष व्यक्त केला. येथील प्रभाग ४ मध्ये पाणीपुरवठा होत नसल्यामुळे यापूर्वी या प्रभागातील महिला व पुरूषांनी येथील ग्रा.पं. कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे या प्रभागात अद्यापही पाण पुरवठा सुरू न झाल्याने दि ३१ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या प्रभागातील महिला व पुरूष रिकाम्या हंड्यांसह ग्रा.पं. कार्यालयाजवळ आले असता त्यांना हे कार्यालय बंद दिसले. त्यानंतर हे सर्व महिला पुरूष ग्रा.पं. कार्यालयासमोरील जालना-औरंगाबाद महामार्गावर आले व त्यांनी अचानक रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करून आपला रोष व्यक्त केला. यावेळी सपोनि पंकज जाधव, पोउपनि राठोड व त्यांच्या सहकार्यांनी गावकर्यांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. गावकर्यांसोबत गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, पाणीपुरवठा अभियंता जाधव यांनी चर्चा करून आंदोलनकर्त्यांना येत्या ३ जूनपर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रामभाऊ उणगे, बाबासाहेब खैरे,मुरलीधर शिंदे,भगवान रेगुडे, अंबादास कोळसकर,लताबाई सुळे, सविता बनकर, शारदाबाई उणगे, जिजाबाई बनकर,लंकाबाई शिर्के, सुमनबाई सावंत, केसरबाई सावंत, लक्ष्मीबाई जºहाड, शांताबाई जºहाड, आसराबाई जºहाड यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)
बदनापुरात पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको
By admin | Updated: June 1, 2014 00:28 IST