जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चारही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून त्याचा परिणाम जालना, अंबड, परतूर व भोकरदन शहरातील नागरी सेवेवर झाला आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी आणि घाणेवाडी जलाशयातील पाणीपुरवठाही बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत १५ जुलैपासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेने संप सुरू करून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पालिकेत जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, नामांतर विभाग, बांधकाम परवानगी देणे इत्यादी कामे बंद आहेत. त्याचप्रमाणे पाच दिवसांमध्ये ज्या भागात सार्वजनिक पाणीपुरवठा होणे आवश्यक होते, अशा जुना जालन्यातील नूतन वसाहत, कचेरी रोड, शंकरनगर, संजयनगर, ओमनगर, देहेडकरवाडी तसेच नवीन जालन्यातील दानाबाजार, गोपिकिशननगर, काद्राबाद व रामनगरचा काही भाग या ठिकाणी पाणीपुरवठा झालेला नाही. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शहरात स्वच्छतेची कामेही बंद आहेत. त्यामुळे मंगळ बाजार, शिवाजी पुतळा, महात्मा फुले मार्केट परिसर, राजमहेल टॉकिज, दे. राजा रोड, शनिमंदिर, नूतन वसाहत, देहेडकरवाडी इत्यादी भागातही कचऱ्याचे ढीग कायम आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरविकास प्रशासन कार्यालयास नगरपालिकांमधून दररोज जी माहिती द्यावी लागते, ती माहितीदेखील जाणे बंद झाले आहे. (प्रतिनिधी)नगरविकास राज्यमंत्र्यांसमवेत झालेली चर्चा निष्फळदोन दिवसांपूर्वी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंत्रालयात संघटनेच्या शिष्टमंडळाने केलेली चर्चा निष्फळ ठरली. या चर्चेत जिल्ह्यातून डी.आर. खिल्लारे, केशव कानपुडे आदी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून पालिका कार्यालयासमोर धरणे देण्यात येत आहेत. विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते संपकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवित आहेत. संपाची धार तीव्र करण्याचा कर्मचारी संघटनेने केला निर्धारशासनाचे प्रतिनिधी म्हणून नगरविकास राज्यमंत्री तसेच या खात्याचे सचिव यांच्यासमवेत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने नगर परिषद कर्मचारी संघटनेने संपाची धार तीव्र करण्यात निर्धार केला आहे. संघटनेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी म्हटले की, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन सेवा पूर्णपणे बंद करणार आहोत. कानपुडे म्हणाले की, यापूर्वी २००६ मध्ये पालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, यासाठी १६ दिवसांचा संप केला होता. त्यानंतर दीर्घकाळ संप पुकारण्याची ही दुसरी वेळ आहे. शासनाने आमच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास संप सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
जायकवाडी,घाणेवाडीचा पाणीपुरवठा झाला बंद
By admin | Updated: July 20, 2014 00:30 IST