औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यानंतर मागील आठवड्यात महापालिका प्रशासनाने शहरात २६ कंटेन्मेंट झोन जाहीर केले. केंद्रीय पथक येणार म्हणून गुरुवारी तातडीने विविध वसाहतींमध्ये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बॅनर लावले. मात्र, उपाययोजना काहीच केल्या नाहीत. त्यामुळे शुक्रवारी केंद्रीय पथकाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची ये-जा त्वरित बंद करा, असे आदेश दिले.
शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दररोज १३०० ते १४०० रुग्ण तर २५ ते ३० जणांचा मृत्यू होत आहे. या विदारक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले. पथकाने गुरुवारी ग्रामीण भागात फिरून पाहणी केली. शुक्रवारी पथक शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात फिरले. कोरोना चाचणी कक्षालादेखील त्यांनी भेट दिली. कोविड केअर सेंटर्सची पाहणी केली. महापालिकेतील वॉर रूमच्या कामकाजाचा आढावादेखील त्यांनी घेतला.
सकाळी नऊ वाजेपासून पथकातील सदस्य डॉ. अभिजित पाखरे यांनी पाहणी दौऱ्यास सुरुवात केली. प्रत्येक वॉर्ड कार्यालयाच्या क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची त्यांनी पाहणी केली. या वेळी आरोग्य अधिकारी, वॉर्ड अधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते. डॉ. पाखरे यांनी अत्यंत बारकाईने कंटेन्मेंट झोनजवळची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी व्यापक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मनपाच्या कामाबद्दल समाधानकेंद्रीय पथकाने आशा वर्कर्सच्या कामाची प्रशंसा केली. रिलायन्स मॉल येथे तपासणीसाठी आणखीन एक पथक नियुक्त करण्याची सूचना त्यांनी केली. एमआयटी येथील कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. पाखरे यांनी महापालिका मुख्यालयातील वॉररूमची पाहणी केली. एमएचएमएच ॲपची कार्यपद्धती त्यांनी जाणून घेतली. उद्या केंद्रीय पथक शहरातील विविध रुग्णालयांना भेट देणार आहे.