औरंगाबाद : पैठणगेट येथील सर्जिकल स्टोअरमधून अडीच लाख रुपये चोरणाऱ्या एका अल्पवयीन चोरट्यासह तीन जणांना क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर एका आरोपीची घर झडती घेतली तेव्हा तेथे तब्बल १८ लाख रुपयांची रोकड पोलिसांच्या हाती लागली. अडीच लाख रुपये चोरणाऱ्या चोरट्याच्या घरात एवढे मोठे घबाड मिळाल्याने पोलीसही चकित झाले. कुणाल गंगावणे (२५,रा. शंभूनगर), किरण सनान्से आणि एका अल्पवयीन युवकाचा आरोपीत समावेश आहे. याविषयी पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे म्हणाले की, पैठणगेट येथील जिजामाता कॉलनी येथे सतीश गांधी यांच्या पूर्वा सर्जिकलमधून रोख २ लाख ५४ हजार रुपये चोरीला गेले होते. १ जून रोजी झालेल्या चोरीची ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै द झाली. त्या फुटेजमध्ये गांधी यांच्याकडे सहा ते आठ महिन्यांपूर्वी काम करणारा अल्पवयीन युवक आणि कुणाल गंगावणे हे चोरी करताना स्पष्टपणे दिसत आहेत. आरोपींनी मोठ्या शिताफीने ही चोरी केली. १ जूनच्या रात्री दुकानमालकाची नजर चुकवून ते दुकानात शिरले आणि रात्रभर दुकानात मुक्काम केला. यावेळी दुकानातील कपाटात ठेवलेले रोेख २ लाख ५४ हजार रुपये त्यांनी चोरले. दुसऱ्या दिवशी दुकान उघडताच पुन्हा दुकानमालकाची नजर चुकवून निघून जात असल्याचे दिसले होते. या घटनेप्रकरणी गांधी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करीत दोन्ही आरोपींना पकडले. पंचांसमक्ष त्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा कुणालच्या घरात रोख १८ लाख २२ हजार रुपये पोलिसांना सापडले. एवढी मोठी रक्कम तुझ्या घरात कशी, असा सवाल पोलिसांनी कुणाल आणि त्याच्या आई-वडिलांना केला. तेव्हा कुणालच्या वडिलांनी ते स्वत: धार्मिक काम करतात आणि लोक आपल्याला पैसे आणून देत असल्याचे पोलिसांना सांगितले. ठेकेदारानेही सांगितला दावा विकास पवार नावाचा लेबर कॉन्ट्रॅक्टरही पोलिसांकडे आला. त्यांनीही ही रक्कम आपली असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली तेव्हा पवार यांच्या एसबीआयच्या बँक खात्यात १० जून रोजी ५ लाख रुपये जमा झाले होते आणि यापैकी ४ लाख रुपये त्यांनी बँकेतून काढल्याचे आढळले. कुणाल गंगावणे हा कुख्यात अजय ठाकूर गँगचा सदस्य असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. १ जून रोजी गांधी यांच्या दुकानातून अडीच लाखांहून अधिक रक्कम चोरल्यानंतर कुणालने अल्पवयीन आरोपीस पाच हजार रुपये दिले. ही रक्कम घेऊन तू मुंबईला जा, पोलीस तुला शोधणार नाहीत, असे त्यास सांगितले. अजय ठाकूरची गँग शहरात सतत लहान मोठ्या चोऱ्या करीत असते. लूटमार आणि चोरीच्या गुन्ह्यातील ही रक्कम असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने तपास करीत असल्याचे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले. या टोळीकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चोरले अडीच; सापडले १८ लाख
By admin | Updated: June 13, 2016 00:47 IST