औरंगाबाद : खाम नदीत घातक रसायन टँकरने आणून टाकण्याचे प्रकरण आपल्याकडे येताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री वाळूज औद्योगिक वसाहतीमधील स्टरलाईट कंपनीचा वितरणप्रणाली व्यवस्थापक अमित रत्नपारखी याला अटक केली. या प्रकरणी तत्कालीन नगरसेवक आगा खान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, चंदन नागेंद्र सिंग, तुषार तुकाराम पाखरे व अस्लम कलीम शेख हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी खाम नदीत टँकरमधून घातक रसायन सोडले जात असताना पाच जणांना पकडले होते. घ् तपासामध्ये आरोपींनी स्टरलाईट कंपनीमधून रसायन आणल्याचे समोर आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हे शाखेने स्टरलाईट कंपनीचा प्रकल्पप्रमुख अनिल भदोरिया आणि वितरणप्रणाली व्यवस्थापक अमित रत्नपारखी यांना बोलावून घेतले व त्यांची सखोल चौकशी केली.रत्नपारखीने घातक रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी आशिष जैन यांच्या इंदौर येथील बंद पडलेल्या बालाजी इंडस्ट्रीज या कंपनीशी करार केला. तसेच त्याने गुजरात आणि ठाणे येथील अन्य दोन कंपन्यांसोबत करार केला. ४स्टरलाईटमधून टँकर भरून घेतलेले रसायन संबंधित ठाणे, गुजरात अथवा मध्यप्रदेश आदी ठिकाणी घेऊन जाणे आणि परत येण्याकरिता किमान चार दिवसांचा अवधी लागू शकतो. मात्र, रत्नपारखी हा दर दोन दिवसांनंतर त्या टँकरच्या नावे पावती फाडत असे. तो अटकेतील आरोपी आणि फरार आरोपींच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे आघाव यांनी सांगितले.
स्टरलाईट कंपनीचा व्यवस्थापक अटकेत
By admin | Updated: May 12, 2015 00:56 IST