औरंगाबाद : ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरप्रेन्युअरशिप व्होकेशनल गाईडन्स अँड करिअर कौन्सिलिंग’चे शिक्षण घेणाऱ्या ४० विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच सर्वांना नापास केल्याचा प्रताप समोर आला आहे. यासंदर्भात शनिवारी संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. जनशिक्षण संस्थान संचलित ‘व्होकेशनल गाईडन्स अँड करिअर कौन्सिलिंग महाविद्यालयाचे’ प्राचार्य डॉ. सतीश सुराणा व विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. चोपडे यांची भेट घेऊन या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्य तथा अधिष्ठाता डॉ. गणेश शेटकर यांनी केलेल्या कारनाम्यांचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, एकतर आमचा हा अभ्यासक्रम सामाजिकशास्त्रे विभागाशी संलग्नित आहे. असे असताना या अभ्यासक्रमाची परीक्षा ही शिक्षणशास्त्र विभागामार्फत कशी घेतली जाते. डॉ. शेटकर यांनी या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच निकाल जाहीर कसा केला, या प्रकरणाची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी व दोषी शेटकर यांच्याविरुद्ध कारवाई करावी. तेव्हा कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचा हा प्रश्न परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करून सोडविला जाईल, असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात वार्षिक लेखी परीक्षा दिली. सर्व विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले; मात्र प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्व विद्यार्थी लेखी परीक्षेत पास, तर प्रात्यक्षिकामध्ये नापास करण्यात आले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे वारंवार निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर कंटाळून विद्यार्थ्यांनी विद्यापीठात ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर अभ्यास मंडळ (बीओई) बैठकीमध्ये चर्चा करून यासंबंधी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी गीता अंभोरे, महादेव डोंगरे, सोमनाथ टोपे, शीतल तुसामकर, गजानन वैद्य, संतोष माळी, धम्मरत्न मेश्राम, गणेश कमोद, दादासाहेब खेलवाने, प्रणाली जगजीवन, भगवान बावस्कर, सुनील चव्हाण आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतप्त विद्यार्थ्यांचे विद्यापीठात ठिय्या आंदोलन
By admin | Updated: April 7, 2015 01:26 IST