औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथे २७ जानेवारीपासून आ. सतीश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.या स्पर्धेत राज्यभरातून मुला व मुलीचे ३५ ते ४0 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. हा खेळ रुजवण्यासाठी शाळा हे केंद्रबिंदू मानण्यात यावा. क्लब व संघटनेतर्फे आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करणे, त्यांना मैदान उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यासाठी मेसची व्यवस्था केल्यास शहरात प्रतिभावान खेळाडू घडतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे यांनी सॉफ्टबॉल खेळासाठी विभागीय क्रीडा संकुल येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सुटीच्या दिवशीदेखील स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे तांदळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.व्ही. अष्टेकर, दिलीप चव्हाण, एकनाथ साळुंके, राकेश खैरनार, गणेश बेटुदे आदी उपस्थित होते.
औरंगाबादला शनिवारपासून राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:56 IST