उस्मानाबाद : राज्यात शेतकऱ्यांचे धान्य कवडीमोल भावाने खरेदी केले जात असून, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे आणि खत उपलब्ध करुन देण्यातही शासनाला अपयश आल्याचे सांगत, सेना-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बेफिकीर असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना केला.विखे-पाटील यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, लक्ष्मण सरडे, नितीन बागल आदींची उपस्थिती होती. आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. मात्र त्यावेळी तत्कालीन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शासनाने खरीप, रबी हंगामातील पिकांच्या नुकसानीची भरपाई गारपिटीच्या अनुदानासह तात्काळ दिली. मात्र सेना-भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचे ते म्हणाले. सततची नापिकी आणि पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा कर्जबाजारी झाला आहे. मुलांचे शिक्षण, मुलींच्या लग्नासाठी हातावर पैसा नसल्याने त्याला नैराश्य आले आहे. ही बाब दुर्दैैवी असल्याचे सांगत, या सर्व प्रकाराला सेना-भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी यावेळी केला. जिल्हा पाणी टंचाईसह दुष्काळाने होरपळत असताना तसेच चाराटंचाई तीव्र असतानाही शासनाने एकही चारा छावणी सुरु केली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार बेफिकीर
By admin | Updated: May 19, 2015 00:47 IST