उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करून अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी ‘क्वॉलिटी सर्कल’ योजना राबविण्यात येत आहे़ यात जिल्ह्यातील आगारनिहाय दोन ग्रुप तयार करण्यात आले असून, एका ग्रुपमधील पाच ते सहा अधिकारी, कर्मचारी बसची स्वच्छता, बसमधील तांत्रिक दोष, प्रवाशांच्या अडचणी जाणून घेणार आहेत़‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने अधिकाधिक प्रवाशांनी बसमधून प्रवास करावा, म्हणून यापूर्वीही अनेक योजना राबविल्या आहेत़ वाहक-चालकांनी प्रवाशांना मदत करणे, वाहकांनी बसमध्ये प्रवाशांचे स्वागत करणे आदी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत़ यापुढे एक पाऊल टाकून ‘क्वॉलिटी सर्कल’ ही योजना राबविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे़ यानुसार उस्मानाबाद विभागांतर्गतच्या उस्मानाबाद, भूम, परंडा, उमरगा, तुळजापूर, कळंब या सहा आगारांमध्ये सर्कलनिहाय दोन ग्रुप स्थापन करण्यात आले आहेत़ यातील पहिल्या सर्कलमध्ये एक स्वच्छक, दोन मेकॅनिक, सहाय्यक कार्याशाळा अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या सर्कलमध्ये दोन ग्रुप करून दोन शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ हा ग्रुप आगारातील देखभाल झालेल्या बसेस स्वच्छ होवून जातील याची खतरजमा करणे, स्वच्छतेबाबत येणाऱ्या अडचणी सोडविणे, अडचणींवर चर्चा करून मार्ग काढणे, ग्रुपच्या कक्षेबाहेरील मुद्याबाबत आगारप्रमुखांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे काम करतील़ मात्र, सर्व बसेस अधिकाधिक स्वच्छ होवून बाहेर पडतील, ही जबाबदारी या ग्रुपवर देण्यात आली आहे़ तर दुसऱ्यया क्वॉलिटी सर्कल ग्रुपमध्ये दोन हेड मेकॅनिक यांच्याबरोबरच दोन मेकॅनिक, एक सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे़ यांचेही दोन शिफ्टसाठी दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत़ हा ग्रुप बसेसचे सहामाही डॉकींग, आरटीओ/आरसी पासिंग, हेवी बॉडी रिपेअर व अपघात दुरूस्तीचे कामे करणार आहे़ विभागीय कार्यशाळेतील वाहनांच्या दुरूस्तीचा दर्जा उंचावल्यानंतर मार्गावर होणारे बिघाड कमी होणार आहेत़ शिवाय आगारात येणाऱ्या बसेसची पाहणी करणे, चालकांनी सांगितलेल्या त्रुटी दूर करूनच बस आगाराबाहेर काढण्याची जबाबदारी या ग्रुपवर देण्यात आली आहे़ एकूणच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला असला तरी आगारनिहाय सर्कलमधील अधिकारी, कर्मचारी याचे किती प्रमाणात तंतोतंत पालन करणार आणि याचा प्रवाशांना आणि पर्यायाने महामंडळाला किती लाभ होणार ? हे आगामी काळात समोर येणार आहे़ (प्रतिनिधी)आगारातील दोन सर्कल ग्रुप प्रमाणेच विभागीय कार्यशाळेतही सर्कल तयार करून अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ हा ग्रुप सहाही आगारातील सर्कनिहाय ग्रुपच्या कामाची चौकशी करणार असून, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.वरिष्ठांच्या सूचनेनुसार उस्मानाबाद विभागातील सहाही आगारात दोन क्वॉलिटी सर्कल तयार करण्यात आले आहेत़ त्यात नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबाबत सूचित करण्यात आले आहे़ प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू असल्याचे विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
एस.टी.बसेस होणार चकाचक
By admin | Updated: May 27, 2015 00:40 IST