अतुल शहाणे, पूर्णायुवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण व आरोग्यासोबतच मनोरंजन व खेळ महत्त्वाचा घटक आहे़ सरावासाठी सोयीचे ठरण्यासाठी तालुकानिहाय क्रीडा संकुल उभारण्याची शासकीय योजना आहे़ परंतु, पूर्णा येथे उपलब्ध जागा व प्रशासकीय मंजुरीनंतरही क्रीडा संकुल लाल फितीत अडकले आहे़ तालुक्याची लोकसंख्या पावणेदोन लाख आहे़ या तालुक्यात जवळपास १०० गावांचा समावेश आहे़ शासनाच्या वतीने क्रीडा व शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी विविध मैदानी स्पर्धा घेतल्या जातात़ परंतु, क्रीडा संकुल नसल्यामुळे बहुतांश स्पर्धा शाळेच्या प्रांगणात किंवा खाजगी मोकळ्या जागेत घेतल्या जातात़ त्यामुळे खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत़ त्यामुळे खेळापासून खेळाडू दूर जात आहेत़ खेळाडू व क्रीडा प्रेमी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पूर्णा येथे क्रीडासंकुलास मंजुरी मिळाली़ परंतु, पालिकेची असलेली चार एकर जागा यासाठी आरक्षित करण्यात आली़ अनेक वर्षे उलटूनही या जागेवर क्रीडांगण उभारण्यासाठी अपेक्षित असलेला निधी व प्रशासकीय मान्यताही मिळाली़ परंतु, अजूनही या क्रीडांगणाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त सापडला नाही़ शहरातील रोशन क्रिकेट क्लब, शारीरिक शिक्षक संघटना, भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने पूर्णा येथील संकुलाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़ परंतु, हे क्रीडा संकुल लाल फितीत अडकले आहे़ त्यामुळे तालुक्यातील खेळाडूंना आपल्या हक्काच्या क्रीडा संकुलापासून वंचित रहावे लागत आहेत़ कोणत्याही सुविधा नसतानाही जिल्हा व राज्यस्तरावर खेळाडू आपला ठसा उमटवित आहेत़ परंतु, त्याचे देणे-घेणे कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ निधी धूळखात पूर्णा शहरामध्ये क्रीडा संकुल उभारणीसाठी आलेला निधी राजकीय व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे धूळखात आहे़ याचे सोयरसूतक लोकप्रतिनिधींना नसल्याचे दिसून येत आहे़ गोरगरीब होतकरू खेळाडू प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खेळामध्ये बाजी मारताना दिसत आहेत़ परंतु, या खेळाडूंना मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे़
क्रीडा संकुल अडकले लालफितीत
By admin | Updated: July 22, 2014 00:10 IST