बीड : ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने आयोजित केलेल्या संदीप काळे प्रस्तूत ‘ये शाम मस्तानी’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम सोमवारी पार पाडला.कार्यक्रमाची सुरूवात सिल्विया निर्मळ यांनी गायलेल्या ‘रेणुका माऊली’ या देवीच्या गाण्याने करण्यात आली. गौरव पवार, धम्मपाल हिवराळे यांनीही ‘शिर्डीवाले साईबाबा, मन उधाण वाऱ्याचे’ यासारखे विविध गीते सादर करून त्यांना साथ देत कार्यक्रमात रंगत आणली. निवेदन अभय गायकवाड यांनी केले. श्रद्धा या नर्तिकेने ‘अप्सरा आली’ या गाण्यावर नृत्य केले. ‘मला वेड लागले प्रेमाचे’ हे गौरव व सिल्विया यांनी गायलेल्या मराठमोळ्या गाण्याने सखींची वाहवा मिळविली. त्यानंतर गायकांनी हिंदी गाणे गावून सखींची मने जिंकली. त्यानंतर सुरू झाला तो डान्सचा हंगामा. खंडेरायाच्या लग्नाला, लल्लाटी भंडार, ‘राधा ही बावरी’ या गीतांवर सखींनी नृत्य करून दाद दिली. ‘ही पोली साजूक तुपातली’ या गाण्यावर काही सखींनी जागेवर तर काहींनी चक्क स्टेजवर जाऊन मनमोकळा डान्स केला. यावेळी उपस्थित महिलांनी त्यांना टाळ्या व शिट्या वाजवून दाद दिली. कार्यक्रमाचे प्रायोजक सचिन ज्वेलर्सचे सचिन डहाळे, कल्पना डहाळे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.उज्ज्वला वनवे यांनी केले. (प्रतिनिधी)
‘ये शाम मस्तानी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: October 1, 2014 00:54 IST