नांदेड : ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्ह्याला मार्च २०१६ अखेर १५ कोटी ६९ लाख ७७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला़ हा निधी यापूर्वीच जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी या निधीचा वेळेत व योग्य पद्धतीने विनियोग होण्यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले आहेत़ जिल्हाधिकारी काकाणी यांनी सांगितले, निधीच्या खर्चाबाबतची विवरण पत्रे व वेळोवेळीचा अहवालही सादर करण्याच्या, त्याबाबत विहित पद्धतीचे काटेकोर पालन व्हावे, असेही सूचित करण्यात आले आहे़ जिल्ह्यात मार्च २०१६ अखेर प्राप्त झालेला हा निधी तातडीने जिल्हा परिषदेच्या वेळेत यंत्रणांकडे वितरीत करण्यात आला़ यापुढेही निधी- अभावी पाणीटंचाई निवारणाचे कोणतेही काम प्रलंबित राहू नये, असे प्रयत्न आहेत़ ज्या टप्प्यावर टंचाई निवारण उपाययोजनांसाठी प्रस्ताव येत जातील त्यांची पडताळणी करून मागणीप्रमाणे अशा कामांनाही पुढे वेळेत निधी मिळेल, याची दक्षता घेतली जात आहे़ जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी व त्यासाठीच्या उपाययोजनासाठी वेळेत निधीची मागणी करण्यात आली होती़ त्यानुसार विभागीय आयुक्तालयाने २१ मार्च २०१६ च्या आदेशान्वये पहिल्य टप्प्यात ६ कोटी २९ लाख ९५ हजार रूपयांचा निधी जिल्ह्याला वितरित केला़ त्यामध्ये विंधन विहिरींची विशेष दुरूस्तीसाठी २९ लाख ६० हजार रूपये, टँकरच्या इंधनासाठी ३ कोटी ९७ लाख ४५ हजार रूपये, तसेच विहीर अधिग्रहणासाठी २ कोटी २ लाख ९० हजार रूपये यानुसार उपाययोजनांकरिता निधी प्राप्त झाला होता़ त्यानंतर ३१ मार्च २०१६ च्या दुसऱ्या आदेशान्वये टँकरच्या इंधनसाठी ६ कोटी ६० लाख रूपये आणि विहिर अधिग्रहणासाठी २ कोटी ८९ लाख ८२ हजार रूपये असा एकूण ९ कोटी ३९ लाख ८२ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ (प्रतिनिधी)
१५ कोटी ६९ लाखांचा निधी वेळेत खर्च करा
By admin | Updated: April 18, 2016 00:44 IST