औरंगाबाद : सर्व्हिस रोडचा प्रश्न सुटला तर बीड बायपासवरील अपघातांना रोखता येऊ शकेल, असे मत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सोमवारी बीड बायपास रस्त्याच्या पाहणीनंतर व्यक्त केले. वाहनांचा वेग कमी करणे, दुचाकीचालकांना हेल्मेट सक्ती आणि तुटलेले दुभाजक जोडणे, आदी उपायही तातडीने करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड बायपासवर मागील काही दिवसांत चार बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसह बायपासची पाहणी करण्यात आली. डॉ. गुप्तांसह उपायुक्त मीना मकवाना, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सुरेंद्र माळाळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी पाहणी केली. महानुभाव आश्रम चौक, एम आय टी चौक, गोदावरी टी पॉईंट, देवळाई चौक आणि पुढे बाळापूर फाट्यापर्यंत विविध ठिकाणी कार थांबवून प्रत्येक चौकातील प्रश्न समजावून घेतले.
याविषयी पोलीस आयुक्त म्हणाले की, सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लागल्यास दुचाकीस्वारांना सर्व्हिस रस्त्यावरून दुचाकी वळविता येऊ शकेल. याशिवाय बायपासवरील तुटलेले दुभाजक अपघाताचे केंद्र बनतात. यामुळे हे दुभाजक पुन्हा जोडणे, गतिरोधक टाकणे यासह तेथील अन्य समस्यांवर दोन - तीन दिवसांत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाणार आहे.
====
चौकट
बायपासवर हेल्मेट सक्ती
बायपास हा महामार्ग म्हणून ओळखला जातो. यामुळे बायपासवर प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकांना हेल्मेट घालणे बंधनकारक केले जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.