पालम : अपघातात गंभीर झालेल्या रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक नऊ वातानुकूलित रुग्णवाहिका परभणी जिल्ह्यास प्राप्त झाल्या असून त्यापैकी एक पालम शहरात दाखल झाली आहे़ १०८ नंबरवर डायल करून या रुग्णसेवेचा लाभ घेता येणार आहे़ आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या प्रयत्नामुळे ह्या रुग्णवाहिका जिल्ह्यास मिळाल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रुग्ण सेवेचा उपक्रम राबविण्यात येत आहे़ हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी भारत विकास ग्रुप यांच्याकडे देण्यात आली आहे़ या ग्रुपकडून ही अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात आली आहे़ ग्रामीण रुग्णालय हे या रुग्णवाहिकेचे मुख्यालय राहणार आहे़ या रुग्ण वाहिकेतील रुग्णांच्या सेवेसाठी डॉ़ बालाजी ईप्पर व डॉ़ गुणवंत जगटकर यांची निवड झाली आहे़ ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता पोलिस निरीक्षक शिवाजी सोनवणे यांच्या हस्ते रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ़ किरण बिडवई, वैद्यकीय अधिकारी डॉ़ ईनायत वाकरडकर यांची उपस्थिती होती़ रुग्णवाहिकेत व्हेंटीलेटर, ईसीजी, सक्षम मशिन, लेबुलायजर, अत्याधुनिक ट्रॉली आदी सेवा उपलब्ध आहेत़ फौजिया खान यांचे स्वीय सहाय्यक डॉ. जावेद अथर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. रुग्णांना दवाखान्यात नेईपर्यंत मोफत सेवा देण्यात येणार आहे़ या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे़ (प्रतिनिधी) पालम शहरातून गंगाखेड- लोहा हा राज्य महामार्ग जातो़ या मार्गावर अनेक वेळा अपघात घडत असतात़ अपघातातील गंभीर रुग्ण व अचानक घडलेल्या घटनांतील रुग्णांना अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा फायदा होणार आहे़
रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका
By admin | Updated: May 9, 2014 00:39 IST