पालम : तालुक्यातील खराब रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत आहे. लोकसभेच्या आचारसंहितेचा फटका रस्त्याच्या कामांना बसल्याने डागडुजीची कामे झाली नाहीत. पाऊस पडताच कसरती सुरू होणार, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. पालम शहराला जोडणारा ग्रामीण भागातील एकही रस्ता चांगला राहिलेला नाही. पाच कि.मी.चा प्रवास करण्यासाठी एक -एक तास वेळ लागत आहे, एवढी बकाल अवस्था झालेली आहे. वाहनधारकांना तारेवरच्या कसरती करीत वाहने चालवावी लागतात. खराब रस्त्यांमुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसलेली आहे. खराब रस्ते असल्याने शेतकरीही शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यास धजावत नाहीत. तसेच शेतातील उत्पादित झालेला माल बाजारपेठेपर्यंत आणणे कठीण होऊन बसले आहे. रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडल्याने खड्ड्यांचे रस्ते तयार झाले आहेत. यातच रस्त्याची गिट्टी उखडल्याने अडचणीत भर पडली आहे. यावर्षी उन्हाळ्यामध्ये रस्त्याच्या कामाची दुरुस्ती झालेली नाही. पावसाळा सुरू झाला असून पाऊस पडताच ग्रामस्थांचे हाल सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)
पाऊस पडताच कसरती होणार सुरू
By admin | Updated: June 15, 2014 00:32 IST