परभणी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्याच्या सुधारित भूसंपादन प्रक्रियेस लवकरच सुरुवात होणार असल्याचे संकेत औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्य अभियंत्यांनी दिले़ ही माहिती येथील काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण देशमुख यांनी दिली़ कल्याण-निर्मल हा २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून जातो़ आता या महामार्गाचा ६१ असा क्रमांक आहे़ या महामार्गाला परभणीजवळ बाह्य वळण रस्ता करण्यासाठी आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने १ कोटी ३६ लाख रुपये खर्च केले़ परंतु, तरीही सव्वानऊ किमी लांबीचा हा रस्ता आजपर्यंत पूर्ण झालेला नाही़ निधी अभावी काम ठप्प असल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या सुचनेवरून सरचिटणीस प्रवीण देशमुख यांनी या कामासंदर्भात पाठपुरावा सुरू केला़ या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते़ या प्रकरणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने औरंगाबाद येथे बैठक बोलावली होती़ या बैठकीत प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यु़जे़ चामरगोरे यांनी या प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या व्होयाजॅन्ट्स कंपनीला रस्त्याच्या भूसंपादनासाठी आवश्यक अलाइनमेंट करण्याचे आदेश दिले आहेत़ या संदर्भात चामरगोरे यांनी सांगितले, सार्वजनिक बांधकाम विभागाचा सव्वानऊ किमीचा रस्ता रद्दबातल असून, केंद्रीय नियमावलीस आधीन राहून नवीन प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला आहे़ हा प्रस्ताव मान्यतेच्या अंतीम टप्प्यात आहे़ या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता अग्रक्रमाने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले़ राष्ट्रीय महामार्ग ६१ (पूर्वीचा २२२) अंतर्गत मानवत रोड ते मालेगाव रोड या लांबीचे ३५० कोटी रुपयांचे प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीच्या अंतीम टप्प्यात आहेत़ त्यानुसार ईपीसी मोडल अंतर्गत सुधारित परभणी बाह्य वळण रस्त्यासह सात मीटर रुंदीऐवजी १० मीटर रुंदी वाढविणे निश्चित आहे़ सुधारित बाह्य वळण रस्त्याची प्रस्तावित लांबी १४़६० किमी ग्राह्य धरता या महामार्गावर सद्यस्थितीत शासनाकडे उपलब्ध ६७ किमी लांबीसह एकूण लांबी ८१़६० किमी असताना केंद्र शासनाच्या ईपीसी मोडल अंतर्गत प्रकल्पाच्या ९० टक्के लांबीचे क्षेत्र शासनाच्या ताब्यात असणे प्रमुख अट आहे़ याच अटीवर बाह्य वळण रस्त्याच्या उर्वरित ८़१६ किमी (१० टक्के) लांबीसाठी भूसंपादन निधी वितरित करणे केंद्र शासनाला शक्य आहे़ या प्रस्तावित रस्त्याचा परभणी शहर हद्दीतील नगरविकास आराखड्यातील ६़४६ किमी लांबीसह उर्वरित ८़१६ किमी रस्त्याचे भूसंपादन राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड यांच्यासह सहकाऱ्याने करून दिल्यास केंद्र शासनाच्या सुधारित जमीन अधिग्रहण कायद्यानुसार निधी वितरित करता येईल, असेही चामरगोरे यांनी या बैठकीत स्पष्ट केले़ बैठकीस राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद परिमंडळाचे अधीक्षक अभियंता व्ही़बी़ कुलकर्णी, कार्यकारी अभियंता एम़ के़ भरसट, उपकार्यकारी अभियंता जी़ बी़ स्वामी, व्हायजेन्ट्स कंपनीचे सुपॉल घोष, काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण देशमुख यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)बेकायदेशीर बांधकामांना निर्बंध बाह्य वळण रस्त्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली़ या बैठकीत बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादनाचा नियोजन समितीचा आरक्षित निधी इतर विकास कामांवर खर्च झाल्याचा मुद्दा निघाला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या कामासाठी आवश्यकता असल्यास नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले़ तसेच मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत यापुढे रस्त्याच्या मध्यापासून २८़५ मीटरऐवजी २१ मीटर अंतरावर बांधकाम नाहरकत परवानगी मिळणार आहे़ त्यामुळे याचा फायदा शहरातील ९५० बांधकामधारकांना झाला असून, महामार्गावरील बेकायदेशीर बांधकामांनाही पायबंद बसणार आहे़, अशी माहिती प्रवीण देशमुख यांनी दिली़ सुधारित भूसंपादन प्रक्रियाराष्ट्रीय महामार्गाच्या या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला़ या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने विशेष बैठक बोलावली आणि या बैठकीत सुधारित भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण देशमुख यांनी सांगितले़ १३९ अपघाती मृत्यू१९९६ पासून आजपर्यंत बाह्य वळण रस्त्यासाठी मोजणीच्या कामावरच १ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ सव्वानऊ किमी अंतराचा हा बाह्य वळण रस्ता निधीअभावी रखडल्यामुळे मागील १७ वर्षांत १३९ अपघाती मृत्यू झाले आहेत़ बाह्य रस्ता झाल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल म्हणून प्रवीण देशमुख यांनी रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला़
भूसंपादन प्रक्रियेस लवकरच सुरुवात
By admin | Updated: July 17, 2014 00:25 IST