परळी : येथील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सुविधेच्या अभावामुळे आरोग्य सेवा मिळत नाही़ मागील तीन वर्षांपासून सोनोग्राफी मशीन बंद असल्यामुळे खाजगी दवाखान्यांमधून गोरगरीब रुग्णांना सोनोग्राफी करून घ्यावी लागत आहे़ यामुळे त्यांच्या खिशाला झळ बसत आहे़दहा वर्षापूर्वी परळी येथे १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय अस्तित्वात आले़ या ठिकाणी दररोज ७०० रूग्ण तपासणी व उपचारासाठी येतात़ या उपजिल्हा रुग्णालयात १२ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत़ मात्र मागील काही महिन्यांपासून उपजिल्हा रुग्णालयातील वायरिंग व्यवस्था खराब झाल्याने येथील आॅपरेशन थिएटर नादुरूस्त अवस्थेत आहे़ त्याचबरोबर मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेसाठी परळी येथील रुग्णालयात आलेल्या रुग्णांना उपचार न घेताच परत जावे लागत आहे़ अनेक वेळा परळी येथील रुग्णांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते़ बीड ते परळी हे अंतर १२५ किलोमीटरच्या आसपास आहे़ नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेसाठी एवढ्या दूर गोरगरीब रुग्णांना यावे लागत आहे़ एवढेच नाही तर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत्र सर्जन देखील उपलब्ध नाही़ १०० खाटांच्या या रुग्णालयात आरोग्याचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे आज स्थितीस पहावयास मिळत आहे़ (वार्ताहर)
तीन वर्षांपासून सोनोग्राफी बंद
By admin | Updated: September 19, 2014 01:01 IST