औरंगाबाद : डेंग्यूचा डास गरीब, श्रीमंत, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य असा भेदभाव करून चावत नाही. स्वच्छ पाण्यात पैदास होणाऱ्या डेंग्यूच्या डासांनी शहरात थैमान घातले आहे. शहर तापेने फणफणत असल्यामुळे खाजगी रुग्णालये रुग्णांनी गच्च भरली आहेत. कामगार कॉलनी, विठ्ठलनगरच्या नगरसेविका सविता घडामोडे व मुलगा गजानन घडामोडे यांना काल डेंग्यूसदृश ताप आल्याने धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, घडामोडे यांची आज दुपारी भेट घेतली तेव्हा त्यांना थोडा ताप होता. त्यांची व त्यांच्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. त्यांना डेंग्यू झाला असे म्हणता येणार नाही. तसेच घडामोडे यांचे पती भगवान घडामोडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ताप आल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. डेंग्यूने घेतलेले बळीअश्विनी बोलकर, नितीन साबळे, कोमल मॅथ्यून, भास्कर वाघ, कल्पना भावे, श्रुती कोटलावार, बालाजी फंड, पीयूष नावकर हे आजवर डेंग्यूसदृश आजाराने मृत झाले आहेत.