गजानन काटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवडोदबाजार : औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावर सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या माती कामात रस्त्याच्या कडेने नव्याने लागवड करण्यात आलेली झाडे दाबली जात असल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जुनी झाडे तोडण्यात आल्यावर लगेचच वृक्षलागवडीची केलेली घाई वायफळ जाणार आहे. शिवाय पुन्हा झाडे लावण्याची नामुष्की ओढावली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत प्रशासनाचा लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.पाथ्री येथे नव्यानेच निर्माण झालेल्या स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान यांच्या वतीने औरंगाबाद -जळगाव राज्य महामार्गावरील पाल फाट्यापासून ते वडोदबाजार कमानीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ३ हजार झाडे लावण्यात आली.एकीकडे रस्ता रुंदीकरणाच्या आड येत असलेली झाडे तोडण्याचा सपाटा प्रशासनाने लावलेला असताना दुसरीकडे वृक्ष लागवड करण्यात येत होती. परंतु रस्ता रुंदीकरणाच्या आधीच लावलेली झाडे व्यवस्थित मोजमाप करुन न लावली गेल्याने बहुतेक ठिकाणी सदरची झाडे रस्त्याच्या सुरु असलेल्या माती कामात झाकून जात आहेत.त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सदरच्या झाडांची देखभाल व सुकलेल्या झाडांच्या जागी नवीन रोपटे लावण्यासाठी मजुरांवर व रोपांवर केलेला खर्च वाया जाणार आहे. विशेष म्हणजे सदरच्या झाडांना पाणी टाकण्यासाठी मागील महिन्यात चक्क सरकारी वाहनातून पाणी पुरविण्यात आले होते.आता सदरच्या रोपट्यांना पालवी फुटण्याआधीच त्यांचे अस्तित्व गायब होऊ लागले आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी साधारणपणे प्रत्येकी ८ मीटर रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. जेसीबी व पोकलॅन यंत्राच्या साह्याने रोडलगतची माती काढून साफसफाई केली जात आहे. साफसफाई दरम्यान निघालेल्या मातीत लागवड केलेली झाडे दाबली जात आहेत. त्यामुळे सदरची झाडे पुन्हा जिवंत होणे मुश्किल वाटत आहे. रस्त्याचे काम करणाºया यंत्रणेने सांगितले की, आम्ही आमच्या मोजमापाप्रमाणेच काम करीत आहोत. परंतु बहुतेक ठिकाणी सदरची झाडे कमी अधिक फरकाने लागवड झालेली असल्याने ती मातीआड झाकली जात आहेत.
वृक्षारोपणाची घाई 'मातीत'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:22 IST