गणेश खेडकर, औरंगाबाद महापालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’चा सर्वत्र गाजावाजा सुरू असताना शहर पोलिसांच्या ‘सेफ सिटी’ प्रकल्पाचाही बोलबाला सुरू झाला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पहिल्या टप्प्यात पोलिसांनी महत्त्वाची व संवेदनशील ३० ठिकाणे निवडून ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता सध्याचे पोलीस बळ कमी पडत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. मागील काही दिवसांपासून चोऱ्या, घरफोड्या, खून हे प्रकार वाढले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘सेफ सिटी’ हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून महत्त्वाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम आता पोलीस बसल्या जागेवर करू शकतात. ‘सेफ सिटी’सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे वाहतुकीबरोबरच इतर अनेक गोष्टी पोलिसांना थेट समजणार आहेत. ‘सेफ सिटी’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील ३० महत्त्वाची व संवेदनशील ठिकाणे निवडून पोलिसांनी ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यासाठी आयुक्तालयात स्वतंत्र ‘कंट्रोल रूम’ स्थापन करून स्वतंत्र कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात येत आहे. या ‘कंट्रोल रूम’मधून सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा जवळपास पूर्णत्वास आला आहे. काही दिवसांमध्ये या ‘सेफ सिटी’चे उद्घाटन करण्यात येणार आहे.
‘स्मार्ट’ला आता ‘सेफ सिटी’ची जोड
By admin | Updated: December 16, 2015 00:15 IST