नांदेड :नांदेड : गत दीड महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर मंदीचे सावट आले आहे. सुरुवातीला एप्रिल महिन्यात हळदीला सर्वोच्च ८७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. त्यानंतर मात्र मोठ्या संख्येने हळद विक्रीसाठी बाजारात आली आहे. परिणामी खरेदी करणार्यांची संख्या कमी झाली असून बाजारात पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे खरेदीदारानेही बाजाराकडे पाठ फिरविली आहे. अवकाळी पावसाने काढणीला व्यत्यय आणल्यामुळे बहुसंख्य शेतकर्यांना हळद विक्रीसाठी विलंब झाला. एकाचवेळी आवक वाढली असून दिवसभरात जवळपास १५०० ते २ हजार क्विंटलचा व्यवहार होत आहे. याचा परिणाम चांगल्या दर्जाच्या हळदीलाही मंदीचा फटका बसला असून व्यापार्याकडून मागणी कमी झाली आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने हळद तग धरुन राहिली. अतिवृष्टीमुळे बहुतांश भागातील उत्पादनात घट झाली. मात्र सर्व शेतकर्यांनी एकाच वेळी विक्रीसाठी हळद बाजारात आणल्याने व्यापार्यांना खरेदीदारांची मनधरनी करावी लागत आहे. एका आडत दुकानावर बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागत आहेत. तर विक्री केलेल्या हळदीचे पैसेही येण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा विलंब लागत आहे. यामुळे खरीपाचा हंगाम जवळ येवून ठेपल्याने शेतकर्यापुढे अडचण निर्माण होत आहे.बाजारात खरेदीदारांची संख्या कमी असल्याने खरेदीदार तरी किती शेतमालाची खरेदी करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बाहेर जिल्ह्यातून खरेदीदारांची व्यवस्था केल्यास शेतकर्यांची समस्या सुटण्यास मदत होईल़(प्रतिनिधी) आॅनलाईन बाजारभाव कमी होत असून बाजारात पैशाचा तुटवडा भासत आहे. याशिवाय बाजारात हळदीची आवक जास्त वाढल्यामुळे आॅनलाईन बाजार तुटत आहेत. सध्या जाणवत असलेली मंदी तात्त्पुरती असून जुनच्या नंतर बाजारात तेजी येईल, असे व्यापारी जयप्रकाश लड्डा यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
हळदीवर मंदीचे सावट
By admin | Updated: May 22, 2014 00:31 IST