लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गारखेडा परिसरातील सह्याद्री हिल्स येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील पाच आणि समोरच्या कॉम्प्लेक्समधील एक अशी सहा दुकाने फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. विशेष म्हणजे चोरी करताना एक अल्पवयीन मुलगा तेथील सीसीटीव्हीत कैद झाला. या सर्व चोºयांमध्ये चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील सह्याद्री हिल्स येथील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यापाºयांनी मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपली दुकाने बंद केली आणि रात्री ते घरी गेले. यानंतर चोरट्यांनी प्रथम गुरुराज ट्रेडर्स, मोबाईल शॉपी, स्वीट मार्ट आणि समोरील कॉम्प्लेक्समधील प्रभू हॅण्डलूम या दुकानांचे कुलूप तोडून आणि शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. या सर्व दुकानांतून किरकोळ रकमा आणि माल चोरट्यांनी पळविला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने पोलिसांची गस्त थंडावली आहे. त्याचाच लाभ उचलत चोरट्यांनी एकाच रांगेतील पाच आणि समोरील एक अशी एकूण सहा दुकाने फोडली. विशेष म्हणजे त्या कॉम्पलेक्समध्ये एक बँक आहे. दुकानाच्या गल्ल्यात चिल्लर पैैसे आणि देवघरासमोर ठेवलेली रक्कम चोरट्यांनी लांबविल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील दोन दुकाने केवळ फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी सांगितले. यातील पाच दुकाने पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीतील, तर प्रभू हॅण्डलुम हे दुकान जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत येते. बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दुकान मालकांनी तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
गारखेड्यात फोडली सहा दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:53 IST