लातूर : रेणापूर तालुक्यातील खरोळा ते रेणापूर या रस्त्यावर सेलू पाटीजवळ दोन वर्षांपूर्वी एका दुचाकीस्वाराने महिलेस धडक दिल्यामुळे महिला जखमी झाली होती. याबाबत रेणापूर पोलिसात गुन्हा नोंद होऊन प्रकरण रेणापूर न्यायालयात सुनावणीसाठी आले. न्या. अ.अ. यादव यांच्या न्यायालयाने दुचाकीस्वारास सहा महिने कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ज्ञानोबा सोपान चेवले (रा. बामणी, ता. लातूर) असे शिक्षा झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सेलू जवळगा येथील प्रभावती श्रीपतराव माने या १८ मे २०१३ रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचा भाचा व्यंकट माने यांच्या मोटारसायकलवर बसून सेलू गावाहून लातूरकडे जात असताना पाठीमागून येणारा ज्ञानोबा चेवले या मोटारसायकल स्वाराने त्यांना धडक दिली. या धडकेत प्रभावती माने या गंभीर जखमी झाल्या. खरोळा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत रेणापूर पोलिसात ज्ञानोबा चेवले यांच्याविरुद्ध गु.र.नं. ६३/१३ अन्वये गुन्हा नोंद होता. पोहेकॉ. व्ही.टी. चौगुले यांनी प्रकरणाचा तपास करून रेणापूर न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरण रेणापूर न्यायालयाचे न्या. अ.अ. यादव यांच्या समोर सुनावणीसाठी आले. या प्रकरणी सरकारी वकील जमीर शेख यांनी सरकार पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून न्या. अ.अ. यादव यांनी प्रकरणातील आरोपी ज्ञानोबा चेवले यास कलम ३३८ भादंविनुसार दोषी ठरवीत सहा महिने साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास १५ दिवस कैदेची शिक्षा ठोठावली आहे. (प्रतिनिधी)
दुचाकीची धडक दिल्याने सहा महिन्यांची शिक्षा
By admin | Updated: May 19, 2015 00:48 IST