परभणी : विधानसभा निवडणुकीत सहा उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च लाखाच्या घरात आहे. सहा लाख ४३ हजार रुपये एवढा सर्वाधिक खर्च शिवसेनेचे उमेदवार राहुल पाटील यांचा झाला असून त्यांच्यापाठोपाठ राकाँचे प्रताप देशमुख यांचा ५ लाख ५२ हजार १४४ रुपये खर्च झाला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढविणार्या उमेदवारांना निवडणूक विभागाकडे तीन टप्प्यामध्ये खर्च सादर करणे बंधनकारक आहे. ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारांनी दुसर्या टप्प्यातील खर्च सादर केला. प्रचार यंत्रणा, प्रचार साहित्य, प्रचार कार्यालय, सभा, बैठका, मेळावे आदी बाबींवर उमेदवारांकडून खर्च केला जातो. हा खर्च खर्च नियंत्रण विभागाकडून मागविण्यात येतो. १ ते १२ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारांना होणारा खर्च तीन टप्प्यात सादर करावयाचा आहे. यात ४, ८ आणि १२ ऑक्टोबर असे तीन दिवस खर्चाचे निरिक्षण केले जाणार आहे. दुसर्या टप्प्यामध्ये परभणी विधानसभा मतदारसंघातील २५ उमेदवारांनी खर्च सादर केला. सादर केलेल्या खर्चानुसार शिवसेनेचे राहुल पाटील यांनी सर्वाधिक ६ लाख ४३ हजार ५५७ रुपयांचा खर्च आतापर्यंत केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप देशमुख यांनी ५ लाख ५२ हजार १४४ रुपये, भाजपाचे आनंद भरोसे यांनी ४लाख ४0 हजार १२0 रुपये, काँग्रेसचे इरफानूर रहेमान खान यांनी ३लाख ४0 हजार ९७२रुपये, बसपाचे डी.एस.कदम यांनी २लाख ९९हजार ९१३रुपये तर एमआयएमचे सज्जुलाला यांनी १लाख ८७ हजार २१२रुपये एवढा खर्च केला आहे. इतर सर्व अपक्ष उमेदवारांचा खर्च हजारांमध्ये आहे. /(प्रतिनिधी) |