अंबाजोगाई: सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना विमान हे चित्रात तरी पाहायचे अन्यथा आकाशात उडणारे तरी पाहायचे. विमानात बसण्याचे स्वप्न हे स्वप्नच ठरते. मात्र, लोकमतने ‘संस्काराचे मोती’ ही विद्यार्थ्यांसाठीची योजना राबवून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला विमानाची सफर घडविली. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधीही उपलब्ध करून दिली. प्रथमत: हा सर्व प्रकार स्वप्नवतच वाटत राहिला. मात्र, अंबाजोगाईत आल्यानंतर मला सर्वच बदललेले दिसू लागले, मित्र, शाळेतील शिक्षक व कुटुंबातील सदस्य यांनाही माझ्या विमान सफरीबद्दल कमालीची उत्सुकता लागली होती. या सर्वांनाच मी माझे प्रवास वर्णन व पंतप्रधानांशी साधलेले हितगुज सांगितले अन् सर्वचजण मोठ्या आश्चर्याने अचंबित झाले, अशी प्रतिक्रिया येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश संजय कदम याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ऋषिकेश संजय कदम हा अत्यंत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहे. वडिलांचे छत्र पाच वर्षांपूर्वीच हरवले. त्याचे काका यांनी त्याचे पालकत्व स्वीकारले. चाणाक्ष असलेल्या ऋषिकेशने लोकमतच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या संस्काराचे मोती या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत त्याचा क्रमांकही आला. हवाई सफर हे बक्षीस त्याला प्राप्त झाले. लोकमत परिवाराच्या वतीने या विजेत्यांसाठी दिल्लीपर्यंतची हवाई सफर झाली. चित्रातच पाहिलेले विमान अथवा आकाशात उंच कोठेतरी येणारा विमानाचा आवाज पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग यात ऋषिकेशही मागे नव्हता. त्याला प्रत्यक्ष विमानात बसण्याची संधी चालून आली. विमानात प्रवास करताना विमानातून खाली छोटे छोटे दिसणारे घरे, अथांग सागर हे सर्व पाहून तो भारावून गेला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विद्यार्थ्यांशी झालेली भेट मोदींनी मराठीतून विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद यामुळे सर्वच विद्यार्थी भारावून गेले. याशिवाय संसद भवन, इंडिया गेट, राजघाट, अशी विविध ऐतिहासिक स्थळे या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. हा सर्व प्रकार स्वप्नवतच वाटत होता. मात्र, प्रत्यक्षात अंबाजोगाईत आल्यानंतर प्रत्येकजण उत्सुकतेने माझी विचारपूस करू लागला. माझे अनुभव विचारू लागला. अन् मला त्या विमानसफरीचे महत्त्व कळले. माझ्या या विमानसफरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक लंकेश वेडे, मुख्याध्यापिका कुंदा व्यास, यांच्यासह शिक्षकांनी माझे कौतुक केले, असेही ऋषिकेशने ‘लोकमत’ला अभिमानाने सांगितले. (वार्ताहर)
चित्रात पाहिलेल्या विमानात प्रत्यक्ष बसलो
By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST