लातूर : भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने लातूर जिल्हा मोठा आहे. बहुविकलांग रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांच्या तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात केवळ एकच अपंग बोर्ड आहे. परिणामी, दिव्यांगांना प्रमाणपत्रांसाठी वेटिंग करावी लागत आहे. अन्य जिल्ह्यांत कमीत कमी दोन बोर्ड आहेत. मात्र लातूर जिल्ह्यात एकच बोर्ड असल्याने अपंगांना तपासणी व प्रमाणपत्रांसाठी खेटे मारावे लागत आहेत. अपंग बोर्डाच्या तपासणीनंतर टक्केवारीनुसार मूकबधीर, अंध, अस्थिव्यंग, बहुविकलांग, मतिमंद आदी रुग्णांना प्रमाणपत्र वितरीत केले जाते. या प्रमाणपत्रांच्या आधारे संबंधित रुग्णांना शैक्षणिक सवलती तसेच रेल्वे व एस.टी. प्रवास सवलत, नोकरीत आरक्षण शासनाकडून दिले जाते. प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने जिल्हा रुग्णालयात अपंग बोर्ड स्थापन केला आहे. परंतु, लातूर जिल्ह्यात अशा अपंगांची संख्या जास्त आहे. मात्र बोर्ड एकच आहे. त्यामुळे तपासणी वेळेत होऊ शकत नाही. प्रमाणपत्रालाही विलंब लागतो. सहा-सहा महिन्यांची तपासणीसाठी तारीख दिली जाते. नोंदणी झाल्यानंतर प्रमाणपत्रांसाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागतो. केवळ बोर्ड एक असल्यामुळे ही स्थिती आहे. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांत जिल्हा रुग्णालयात किमान दोन बोर्ड आहेत. त्यामुळे तेथील नोंदणी, तपासणी व प्रमाणपत्रांचे वितरण विनाविलंब होते. लातुरात मात्र रुग्ण वेटिंगवर आहेत. सर्वोपचार रुग्णालयात अस्थिव्यंग, मनोरुग्ण, कर्णबधीर अशा वर्गवारीनुसार तपासणीचे वेळापत्रक केले आहे. दररोज १५ रुग्णांची तपासणी केली जाते. सोमवार, बुधवार कर्णबधीर रुग्णांची तपासणी होते. तर गुरुवारी मनोरुग्णांची तपासणी केली जाते. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी तक्रारींवर निर्णय घेतला जातो. तर दर सकाळी शुक्रवारी १० ते १ या वेळेत नवीन नोंदणी केली जाते आणि दुपारी १ ते २ या वेळेत जुन्या तपासणी झालेल्या रुग्णांना नियमानुसार प्रमाणपत्रांचे वितरण केले जाते. या वेळापत्रकाचे सर्वोपचार रुग्णालय प्रशासन होत असले तरी बोर्ड एकच असल्याने ताण पडत आहे.
एकच बोर्ड; दिव्यांग वेटिंगवर !
By admin | Updated: August 29, 2016 00:58 IST