औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील वीर शिवाजी गणेश मंडळातील श्रीच्या मूर्तीचे आज विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांनी नृत्य करीत आनंद व्यक्त केला. मागील २९ वर्षांपासून पोलीस आयुक्तालयात वीर शिवाजी गणेश मंडळांतर्गत गणपतीची स्थापना करण्यात येत आहे. यानिमित्त दहा दिवस भजनाचे आयोजन केले जाते. विसर्जनाच्या आदल्या दिवशी येथे भंडारा करण्यात आला. त्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलिसांना बंदोबस्तात राहावे लागते. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी पोलीस आयुक्तालयातील मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. रविवारी सायंकाळी ५ वाजता महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनीता नागलोत यांच्या हस्ते श्रीची आरती करण्यात आली. यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत श्रीविसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. युवा कर्मचाऱ्यांनी नृत्य करीत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता. मिरवणूक मिलकॉर्नर, खडकेश्वर, नागेश्वरवाडीमार्गे जि.प. मैदानावर पोहोचली. तेथे आरती झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मेजर ज्ञानोबा मुंडे, गजानन हिवाळे, डी.एम. परदेशी, शेख अकबर शेख रज्जाक, संजय हबीर, सुरेश बोडखे, अशोक देवरे, हे.कॉ. राजूबाई घटे, पोलीस कॉस्टेबल फातिमा खान, कोमल शिर्के, छाया डमाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी हजर होते.
पोलीस आयुक्तालयातील श्री मूर्तीचे विसर्जन
By admin | Updated: September 8, 2014 00:32 IST