औरंगाबाद : सीबीएसई पॅटर्नचा दावा करणाऱ्या शाळांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सोमवारी (दि.१६) अचानक झाडाझडती घेतली. शिक्षण विभागाने मागितलेला दस्तावेज उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरलेल्या शाळांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिली. सीबीएसई, आयसीएसई व तत्सम केंद्रीय मंडळाशी संलग्न असल्याचा दावा करणाऱ्या इंग्रजी शाळांचे शहरात पेव फुटले आहे. या शाळांनी शहरात ठिकठिकाणी जाहिरात फलक उभारले आहेत. या शाळा खरोखरच केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत किंवा नाही, याविषयी संशय उत्पन्न झाल्याने, शिक्षण विभागाने सोमवारी पाच शाळांना भेटी देऊन त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी केली; परंतु यापैकी एकाही शाळेने सीबीएसईशी संलग्नता दर्शविणारी कागदपत्रे या पथकाला दाखविली नाहीत. सदर कागदपत्रे तात्काळ सादर करण्याच्या नोटिसा बचपन प्री-प्रायमरी, खेल खेल में, चिल्ड्रन पार्क आणि युनिव्हर्सल स्कूल या शाळांना बजावण्यात आल्या आहेत. या पथकात शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी आर.डी. महाजन, आर.व्ही. ठाकूर यांचा समावेश होता. केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नतेचा दावा करणाऱ्या सर्व शाळांची कागदपत्रे तपासणीची ही मोहूम पुढेही सुरू राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सीबीएसईची कागदपत्रे दाखवा...
By admin | Updated: June 17, 2014 01:09 IST