लातूर : लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार आता संपला असून, १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. ज्या मतदान केंद्रावर उमेदवारांचे मतदान आहे, त्या केंद्राची वेब कास्टिंग (चित्रिकरण) होणार असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण ९० उमेदवार आहेत. या उमेदवारांचे ज्या मतदान केंद्रावर मतदान आहे, त्या केंद्रावर तलाठी लॅपटॉपचा वापर करून वेब कास्टिंग करणार आहेत. लातूर ग्रामीणमध्ये १३, लातूर शहर ५, अहमदपूर १३, उदगीर १५, निलंगा १५, औसा विधानसभा मतदारसंघात १५ तलाठी वेब कास्टिंग करणार आहेत. तर जिल्ह्यातील क्रिटिकल मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लातूर ग्रामीणमध्ये ३, लातूर शहर ६, अहमदपूर ३, उदगीर ४, निलंगा ३, औसा ४ असे २३ सूक्ष्म निरीक्षक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून संवेदनशील केंद्रांवर निरीक्षण ठेवतील. लातूर जिल्ह्यात एकूण १७ क्रिटिकल मतदान केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये करकट्टा, मुरुड (बु.), लातूर शहरातील ५, अहमदपुरातील २, उदगीरमधील ३, निलंगामधील शिरूर अनंतपाळ व दापका असे २, औसा शहरातील २ व किल्लारीतील १ असे एकूण १७ मतदान केंद्र क्रिटिकल आहेत. या केंद्रावर सीसीटीव्ही कॅॅमेरे लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली. पत्रपरिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटोदकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी खपले, जिल्हा माहिती अधिकारी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. अवैध दारू विक्रीसंदर्भात २६५ कारवाया करण्यात आल्या असून, १० लाख ६ हजार रूपयांची ही दारू आहे़ या प्रकरणातदोन वाहने आणि रसायनेही जप्त करण्यात आली आहेत़ शिवाय सोमवार व मंगळवार असे दोन दिवस जिल्ह्यात नाकाबंदी राहिल, असे पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले़
उमेदवारांच्या मतदान केंद्रांवर चित्रीकरण
By admin | Updated: October 14, 2014 00:33 IST