मादळमोही/गेवराई : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे आठवडी बाजारात पायी चालताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या बाचाबाचीनंतर तरुणाने वृद्धाच्या डोक्यात दगड फेकून मारला. यात वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.कचरू गजाबा कानगुडे (वय ६५, मादळमोही) असे मयताचे नाव आहे. सचिन नामदेव शेजूळ (रा. खांडवी, ता.गेवराई) याला मादळमोही चौकी पोलिसांनी जेरबंद केले. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले, मंगळवारी मादळमोहीचा आठवडी बाजार असतो. या बाजारात कचरू कानगुडे खरेदीसाठी गेले होते. चालताना त्यांचा धक्का सचिन शेजूळ याला लागला. त्यानंतर त्याने कचरू कानगुडे यांना जाब विचारला. बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले. सचिन शेजूळने जवळ पडलेला दगड उचलून कचरू यांच्या दिशेने भिरकावला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने कचरू जागीच कोसळले. त्यांना बाजारकरूंनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोहेकॉ किशोर इंगोले, पोना दत्तात्रय बळवंत, संजय देशमुख यांनी शेजूळला जेरबंद केले. (वार्ताहर)
धक्का लागल्याने वृद्धाचा दगड मारून खून
By admin | Updated: January 24, 2017 23:37 IST